Sat, Nov 17, 2018 12:28होमपेज › Pune › दौंडमध्ये ११ लाखाची दारू जप्‍त, सहा जण ताब्यात

दौंडमध्ये ११ लाखाची दारू जप्‍त, सहा जण ताब्यात

Published On: Feb 04 2018 6:44PM | Last Updated: Feb 04 2018 6:44PMपुणे : प्रतिनिधी

गोव्यात तयार झालेले मद्य आणून त्याला महाराष्ट्राचे लेबल लावून मद्य विक्री करणार्‍या दौंड तालुक्यातील वाळकी येथील कारखान्यावर उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथक क्र. दोनने छापा टाकला. यामध्ये सव्वाअकरा लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून, या प्रकरणी सहा जणांना अटक केली आहे. 

कारखाना चालवणारा अमोल कैलास भालेराव (२७), अमोल रामदास आढाव (३०,  रा. दोघेही वाळकी, ता. दौड),  पारस बस्तमल परमार (३८ रा. रांजणगाव, ता. शिरुर), मंगीलाल मोतीलाल चौधरी (३८, रा. ढोक सांगवी, ता. शिरूर),  शिवाजी नरसिंग भंडारी (४७,  रा. राहू, ता. दौंड) आणि अनिल पंढरीनाथ सायकर (४९, रा. राहू, थोरली विहीर ता. दौंड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. 

गोवानिर्मित मद्य चोरट्या मार्गाने आयात करून त्या बाटल्यावर महारष्ट्रात निर्मिती केल्याचे लेबल लावून मद्य विक्री केली जात असल्याची माहिती पथकाला मिळाली होती, मिळालेल्या माहितीनुसार भरारी पथक क्रमांक दोनचे प्रमुख व्ही. एस. 

कौसडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड तालुक्यातील वाळकी येथे छापा टाकून महाराष्ट्राचे लेबल, गोवानिर्मित मद्यसाठा आणि वाहन (एम.एच. ४२ एक्यू १२५८) असा एकूण ११ लाख २१ हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

उत्पादन शुल्कचे विभागीय उपायुक्त अर्जुन ओव्हाळ, अधीक्षक मोहन वर्दे, उपाधीक्षक सुनील फुलपगार यांच्या मार्गदर्शनाखाली व्ही. एस. कौसडीकर यांनी ही कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये उपनिरीक्षक राजेंद्र झोळ, कैलास वाळुंजकर, जवान महेश बनसोडे, सुनील कुदळे, गोपाल कानडे, महादेवी साळुंखे, खुशी ओझा, केशव वामने यांचा सहभाग होता.