Wed, Apr 24, 2019 01:31होमपेज › Pune › ‘भीमे’च्या बंधार्‍यांना लागले गळतीचे ग्रहण

‘भीमे’च्या बंधार्‍यांना लागले गळतीचे ग्रहण

Published On: Jan 15 2018 1:43AM | Last Updated: Jan 15 2018 1:43AM

बुकमार्क करा
नानगाव : राजेंद्र खोमणे

दौंड व शिरूर तालुक्याला वरदान ठरलेल्या भीमा नदीवरील बंधार्‍यांना गळतीचे ग्रहण लागले आहे. हे ग्रहण ऐन उन्हाळ्यात शेतकर्‍यांचे मरण ठरते; त्यामुळे भीमेच्या बंधार्‍यावरील गळती थांबणार तरी कधी, असा प्रश्‍न नदीकाठच्या शेतकर्‍यांना पडला आहे.

दौंड तालुक्यातील भीमा व मुळा-मुठा; तसेच दौंड व शिरूर तालुक्यातील भीमा नदीवरील बंधार्‍यामुळे मोठ्या प्रमाणात या नदीपात्रात पाण्याचा साठा होत आसतो. त्यामुळे दौंड व शिरूर तालुक्यातील हजारो एकर जमीन बागायती झाली असून, या दोन्ही नदीवरील बंधारे खर्‍या अर्थाने शेतकर्‍यांना वरदान ठरलेले आहेत; मात्र काही वर्षांपासून या बंधार्‍यांना गळतीचे ग्रहण लागले आहे. या बंधार्‍यांना लावण्यात आलेले लोखंडी ढापे हे जुने व गळके; तर मोठ्या प्रमाणात कुजलेले असल्याने या बंधार्‍यातील पाणी साठ्यातून दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. या समस्यांकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष आहे. 

एकीकडे शेतीसाठी होणारा पाण्याचा उपसा; तर दुसरीकडे गळक्या, कुजक्या ढाप्यांतून होणारी पाण्याची गळती यामुळे ऐन उन्हाळ्यात बंधार्‍यातील पाणीसाठा झपाट्याने कमी होतो. ऐन उन्हाळ्यात शेतकर्‍यांपुढे पाण्याचे संकट उभे राहते.; त्यामुळे उन्हाळ्यात पाणी व्यवस्थापन करणे कठीण होत असते.

नदीपात्रातील बंधार्‍यावर चांगल्या प्रतीचे नवीन ढापे टाकून बंधार्‍यांच्या व्यवस्थापनाकडे संबंधित खात्याने लक्ष घालावे, अशी मागणी नदीकाठचे शेतकरी करत आहेत.