Sun, Jul 21, 2019 07:47होमपेज › Pune › भोसरीत युवतींचा मोठा सहभाग 

भोसरीत युवतींचा मोठा सहभाग 

Published On: Aug 10 2018 12:59AM | Last Updated: Aug 09 2018 10:50PMभोसरी : वार्ताहर

सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मराठा समाजासाठी आरक्षणसह विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला भोसरीत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भोसरी परिसरात कडकडीत बंद पाळण्यात आला. परिसरातील बाजारपेठेत शुकशुकाट होता. गुरुवारी (दि. 9) सकाळपासूनच आंदोलनाच्या ठिकाणी मराठा समाजबांधवांनी मोठी गर्दी केली होती.

भोसरीतील पीएमटी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ‘ठिय्या आंदोलना’स सकाळी नऊ वाजता सुरुवात करण्यात आली.  या वेळी बांधवांनी घोषणा देत परिसर दणाणून काढला. ‘एक मराठा लाख मराठा, तुमचं आमचं नातं काय.. जय जिजाऊ जय शिवराय’, कोण म्हणते देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कोणाचा बापाचे... अशा घोषणा या वेळी देण्यात आल्या.  परिसर भगव्या झेंड्यांनी फुलून गेला होता. युवक व युवतींचा ठिय्या आंदोलनात लक्षणीय सहभाग होता. भोसरी परिसरात युवकांनी दुचाकी रॅली काढली. 

सकाळपासूनच भोसरीकरांनी ठिय्या आंदोलनास पाठिंबा दर्शविला होता. परिसरातील शाळा, महाविद्यालये, बँका, हॉटेल्स, दुकाने  उत्स्फूर्तपणे बंद ठेवण्यात आली होती. नेहमीच गजबजलेले रस्ते ओस पडले होते. भोसरीतील मुख्य चौकात शुकशुकाट पसरला होता. मराठा समाजाचा आंदोलनास बहुजन क्रांती संघटनेने पाठिंबा दर्शविला होता.