Thu, Nov 15, 2018 20:09होमपेज › Pune › तडीपार गुंडाकडून  साडेपंधरा लाखांचा ऐवज जप्‍त

तडीपार गुंडाकडून  साडेपंधरा लाखांचा ऐवज जप्‍त

Published On: Aug 12 2018 1:02AM | Last Updated: Aug 12 2018 12:59AMपुणे : प्रतिनिधी

शहरात एकीकडे घरफोड्यांचा धुमाकूळ सुरू असताना शहर व जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेल्या गुंडाकडून घरफोडीतील ऐवज जप्त करण्यात आला आहे. चतुःश्रुंगी पोलिसांनी त्याला अटक करून 11 गुन्हे उघडकीस आणत साडेपंधरा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विशेष म्हणजे, तो वयाच्या 16 व्या वर्षांपासून गुन्हे करत आहे. जयवंत ऊर्फ जयड्या गोवर्धन गायकवाड (32, रा कातवी, ता. मावळ, मूळ- औंध) असे अटक केलेल्या गुंडाचे नाव आहे. 

शहरात बंद घरे फोडून चोरटे डल्ला मारत आहेत. या घटना काही केल्या थांबत नसून, पोलिसांच्या उपाययोजना तोकड्या पडत आहेत. दरम्यान सराईतांना शहर व जिल्ह्यातून तडीपार करण्यात येते. त्यानुसार, गायकवाडला तडीपार केले होते. तरीही तो शहरात येऊन घरफोड्या करत होता. दरम्यान, चतुःश्रुंगी पोलिस ठाण्याच्या तपास पथकाचे उपनिरीक्षक प्रेम वाघमोरे यांना तडीपार गुंड गायकवाड हा पाषाण परिसरातील निम्हण मळा येथे आढळला. त्यानुसार त्याला पथकातील कर्मचारी संतोष जाधव, बबन गुंड, मारुती पारधी यांनी पकडले. त्याच्यावर संशय आल्याने त्याच्याकडे तपास सुरू केला असता घरफोड्या केल्याचे त्याने सांगितले. त्याला अटक करून चोरलेले 422 ग्रॅम सोन्याचे दागिने, अर्धा किलो चांदी, 64 हजार रोख असा एकूण 15 लाख 42 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे, अशी माहिती उत्तर विभागाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त सुनील फुलारी यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

घरफोड्यांचे शतक

गायकवाड हा सराईत गुंड असून, त्याच्यावर आतापर्यंत 87 घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. तर, नवीन अकरा असे एकूण 98 गुन्हे दाखल झाले आहेत. या गुन्ह्यांपैकी 2013 मधील एका गुन्ह्यात त्याला न्यायालयाने एक वर्षाची शिक्षा सुनावली आहे. ही शिक्षा भोगून बाहेर आल्यानंतर त्याने पुन्हा घरफोड्या करण्यास सुरुवात केली. त्यामुळे नोव्हेंबर 2017 मध्ये तडीपार केले होते.