Tue, Mar 19, 2019 20:28होमपेज › Pune › पोलिसांमुळे कोरेगाव भीमा हिंसाचार : प्रदीप रावत  

पोलिसांमुळे कोरेगाव भीमा हिंसाचार : प्रदीप रावत  

Published On: Apr 24 2018 5:05PM | Last Updated: Apr 24 2018 5:00PMपुणे : प्रतिनिधी

वडू येथून तीन किलोमीटर भगवे झेंडे घेऊन कोरेगाव भीमाकडे जाणार्‍या जमावाला पोलिसांनी वेळीच रोखून जमावातील लोकांना इतर ठिकाणी हालविले असते तर कोरेगांव भीमा येथील हिंसाचार टळला असता. खर्‍या आर्थाने पोलिसच या हिंसाचाराला जबाबदार असून कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक, पुणे ग्रामीण पोलिस आधिक्षक आणि शहर पोलिस आयुक्तांनी याप्रकरणामध्ये राज्य सरकारची दिशाभूल केली. असा आरोप भाजपचे माजी खासदार प्रदीप रावत यांनी केला आहे. हा हिंसाचार कोणत्याही आंबेडकरवादी किंवा हिंदुत्त्ववादी विचारांच्या संघटनांचा कट नसून तो माओवादी विचारांच्या संघटनांचा आणि खोटा इतिहास पसरवून समाजात जातीय तेढ निर्माण करणार्‍या गटांचा पुर्वनियोजित कट आहे, असाही आरोप रावत यांनी यावेळी केला. 

कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी २०१८ रोजी झालेल्या हिंसाचाराच्या घटनेचे सत्यशोधन करणार्‍या समितीच्या अहवालाचे प्रदीप रावत यांच्या हस्ते मंगळवारी प्रकाशन झाले. यावेळी रावत बोलत होते. याप्रसंगी सत्यशोधन समितीचे सदस्य कॅप्टन स्मिता गायकवाड, सागर शिंदे, ऍड. सत्यजित तुपे, प्रा. सुभाष खिलारे, दत्ता शिर्के, प्रदीप पवार आदी उपस्थित होते. तत्पूर्वी कॅप्टन स्मिता गायकवाड यांनी कोरेगाव भीमा येथील हिंसाचाराच्या घटनेवर स्लाईडचे सादरीकरण केले. 

प्रदीप रावत म्हणाले, शनिवार वाड्यावर सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी नसताना पुणे शहर पोलिसांनी एल्गार परिषदेस कशी काय परवानगी दिली, यासंदर्भात पोलिस आयुक्तांची चौकशी होणे गरजेचे आहे. याच एल्गार परिषदेमध्ये झालेल्या प्रक्षोभक भाषणामुळे पुढील घटना घडल्या. वडू येथे २८ डिसेंबर रोजी घडलेल्या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर १ जोनेवारी रोजी विजय स्तंभास अभिवादन करण्यास येणार्‍या आंबेडकरी अनुयायांची संख्या लक्षात घेऊन पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे होते. वडू येथून एक जमाव भगवे झेंडे घेऊन तीन किलोमीटर चालत कोरेगाव भीमाच्या दिशेने येत असताना पोलिसांनी त्यांना प्रतिबंध करणे, त्यांना उचलून गाडीत घालून इतर ठिकाणी हालविणे गरजेचे होते. पोलिसांनी प्रतिबंधकात्मक उपाय केले असते, तर राज्याला काळीमा फासणारी हिंसाचाराची घटना घडली नसती. 

पोलिसांचे अपयश लपविण्यासाठी या घटनेनंतर विशेष पोलिस महानिरीक्षक, पुणे ग्रामीण पोलिस आधिक्षक आणि शहर पोलिस आयुक्तांनी राज्य शासन आणि मुख्यमंत्र्यांची दीशाभूल केली. त्यामुळे या तीनही अधिकार्‍यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे. हा हिंसाचार कोणत्याही आंबेडकरवादी किंवा हिंदुत्त्ववादी विचारांच्या संघटनांचा कट नसून तो माओवादी विचारांच्या संघटनांचा आणि खोटा इतिहास पसरवून समाजात जातीय तेढ निर्माण करणार्‍या गटांचा पुर्वनियोजित कट आहे. शहरी माओवाद सर्वांनी समजून घेणे गरजेचे आहे. हिसाचाराची घटना घडल्याबरोबर शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांनी एकबोटे आणि भिडे यांच्यावर आरोप केले. आम्ही केलेल्या सत्यशोधनामध्ये आम्हाला एकबोटे आणि भिंडे यांच्या हिंसाचारात प्रत्येक्ष सहभाग असल्याचे दिसले नाही. हिंसाचारानंतर जमावाने टाकलेल्या दबावामुळे एकबोटे यांच्यावर गुन्हा दाखल केल्याचे दिसते. त्यामुळे या हिंसाचाराचा खरा मास्टरमाईंड समाजासमोर येणे गरजेचे आहे. 

हिंसाचाराप्रकरणी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीमध्ये नाव असलेला गणेश फडतरे हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा कार्यकर्ता आहे. प्रकाश आंबेडकर कोणत्याही प्रकरणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नाव घेतात. बुद्धीवादी नेते असलेल्या प्रकाश आंबेडकरांना संघाची कावीळ झाली आहे, असेही रावत यांनी नमूद केले. हातात निळे झेंडे घेतलेले हिंसाचारातील लोक हे दलितच असतील असे सांगता येत नाही, किंवा हातात भगवे झेंडे घेऊ न हिंसाचार करणारे लोक मराठा समाजातील किंवा हिंदू संघटनांचेच असचतील असे, सांगता येत नाही. ते फुटीरतावादीही असू शकतात, असे कॅप्टन गायकवाड यांनी यावेळी नमुद केले.