Fri, Aug 23, 2019 23:21होमपेज › Pune › जाणून घ्या पुणेरी पगडीविषयी...

जाणून घ्या 'पुणेरी पगडी'विषयी...

Published On: Jun 12 2018 1:01PM | Last Updated: Jun 12 2018 1:01PMशंकर पवार, पुढारी ऑनलाईन

महाराष्‍ट्रात पोषाखात शिरस्‍त्राण हा नेहमीच महत्त्‍वाचा भाग राहिला आहे. त्यात कोल्‍हापूर म्‍हटलं की कोल्‍हापुरी फेटे आणि पुणे म्‍हटलं की पुणेरी पगडी यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. मग कोणताही समारंभ असो की सोहळा ही शिरस्‍त्राणे त्याची शान असणारच. महाराष्‍ट्रात विविध भागात लोक फेटा, टोपी, पगडी वापरतात. त्यात संस्‍कृतीचा जेवढा प्रभाव आहे तेवढंच काहीसं जातीय आणि धार्मिक समिकरणांवरूनही शिरस्‍त्राण ठरलं आहे. पुण्याच्या प्रसिद्ध दगडूशेठ गणपतीलाही हीच पुणेरी पगडी आहे.

पुण्याची पगडी मात्र या सर्वांमध्ये उच्‍चभ्रू, सुशिक्षित लोकांचं प्रतिक ठरली. उच्च विद्याविभूषित लोकं, न्यायदान क्षेत्रातील, सरकारी उच्च पदस्थ मराठी अधिकार्‍याचे हे शिरस्‍त्राण राहिलंय. परंतु, नुकत्याच झालेल्या राष्‍ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात शरद पवार यांनी तिला राजकीय रंग दिला आणि ही पगडी पुन्‍हा एकदा चर्चेत आली. कधी काळी नियमित वापरात असणारी ही पगडी आता केवळ सण आणि समारंभापुरती उरली. मात्र, या पुणेरी पगडीवरून आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्‍ट्रात शाब्‍दीक विद्वत्ता लढविली जाणार हे नक्‍की. 

या पगडीला ब्राम्‍हणी रंग देऊन ब्राम्‍हण आणि ब्राम्‍हणेतर वादाला पुन्‍हा खत-पाणी घातलं जाणार हेही तेवढंच खरं. त्यासाठीच जुना अनुभव विचारात घेता शरद पवार यांनी आजपर्यंत पुणेरी पगडी वापरत असताना निवडणुकांच्या तोंडावर पुणेरी पगडीऐवजी फुलेंची पगडी वापरण्याचं ठरवलेलं दिसतंय. पुण्यातील सर्व कार्यक्रमात सन्‍मानाचं प्रतिक असणार्‍या या पुणेरी पगडीबाबत जाणून घ्यायला आपल्याला नक्‍कीच आवडेल.

पुणेरी पगडीचा इतिहास

महाराष्‍ट्रात पुणेरी पगडीच्या वापरास पेशवाईच्या काळात सुरूवात झाली. परंतु, या पगडीला सर्वात पहिली ओळख दिली ती न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी. न्यायमूर्ती रानडेंची विद्वत्ता हेच या पगडीचं पुढील काळात प्रतिक बनलं आणि गोपाळ कृष्‍ण गोखले,  गोपाळ गणेश आगरकर, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, दत्तो वामन पोतदार, तात्यासाहेब केळकर आदी मंडळींनी पुणेरी पगडीची ओळख आणखी दृढ केली. त्यामुळेच या राष्‍ट्रपुरुषांचे चेहरे आठवायचे तर ते पगडी घातलेलेच आठवतील. 

पुणेरी पगडी वापरणारं शेवटचं महत्त्‍वाचं नाव म्‍हणजे सेतू माधवराव पगडी. सेतू माधवरावांचं इतिहास लेखनाच्या क्षेत्रात मोठं योगदान आहे. अर्थात पुणेरी पगडी वापरणार्‍यांत समाजसुधारक, न्यायमूर्ती, लोकमान्य, इतिहासकार आदी मंडळी होती. त्यामुळेच विद्वत्तेचं प्रतीक अशी या पगडीची ओळख झाली. 

पुणेरी पगडीला जनसामान्यांच्या मनात बिंबवण्यात घाशीराम कोतवाल हे नाटक मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरले. १९७३च्या घाशीराम कोतवाल ह्या नाटकानंतर पुणेरी पगडी अधिक प्रसिद्ध झाली. 

कशी असते पुणेरी पगडी?

पुणेरी पगडी बनवणं तसं सोपं काम नाही. पगडीचे विविध भाग आहेत. अती कुशल कारागीरच ही पगडी बनवू शकत. वरच्या भागाला माथा असं म्‍हटलं जातं. उजव्या बाजूला असणार्‍या उंच भागाला कोका किंवा पोपट आणि त्याचे टोक म्‍हणजे चोच होय. पगडीचं देखणंपण आणि दिमाख या चोचीवर अवलंबून असतो. हा भाग उजव्या डोळ्यावर यायला हवा. चोचीला एक गोंडा असतो त्याला जरतार म्‍हणतात. पगडीच्या कडेला एक पट्टी असते तिला घेरा म्‍हटलं जातं. 

पगडीच्या घेर्‍याखालच्या कपाळावर येणार्‍या भागाला कमल म्‍हणतात तर आतील भागाला गाभा असं म्‍हटलं जातं. पगडीवर केलेल्या कामावरून तिची किंमत ठरते, परंतु यातील एक जरी भाग चुकला तर पगडीची शोभा राहत नाही. १७ व्या शतकापासून ९ इंच रुंद आणि ६५ वार लांब कपड्यापासून ही पगडी बनवली जायची. तीच पद्धत १९ आणि २० व्या शतकातही कायम होती. 

सध्या तयार स्वरूपात मिळणारी पुणेरी पगडी ही पूर्वी कापड घेऊन बांधली जायची. माती किंवा प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा डोक्याच्या आकाराचा साचा बनवला जायचा. या साच्यात विणकर समाजातील कारागीर पगडी बांधायचे. लाल रंगाच्या सुती कपड्यापासून (बत्ती कापड) ही पगडी बांधली जायची. एकदा बांधलेली पगडी पंधरा दिवसांपर्यंत राहायची. आताच्या काळात ही पगडी विविध रंगात मिळत असली तरी लोकांचा ओढा मूळ लाल रंगाकडेच असतो. 

पुण्याची बौद्धिक मालमत्ता

पुणेरी पगडीला विद्येचं माहेर घर मानलं जाणार्‍या पुणे शहराची शान आणि ओळख मानलं जातं. थोरा मोठ्यांनी वापरलेल्या या पगडीची पुणेरी ओळख कायम राखण्यासाठी २००९ मध्ये लोकांनी भौगोलिक वैशिष्‍ट्य म्‍हणून पगडीला मान्यता मिळावी अशी मागणी केली. ४ सप्‍टेंबर २००९ रोजी पुणेरी पगडी पुण्याची बौद्धिक मालमत्ता जाहीर करण्यात आली. त्यामुळे आजही ही पगडी किंवा अशा प्रकारची पगडी पुण्याच्या बाहेर पुणेरी पगडी म्‍हणून विकली जाऊ शकत नाही. त्यामुळे पुण्याची ओळख, शान म्‍हणून आजही पुणेरी पगडी सर्वच मंगल क्षणांत वापरली जाते.