Sun, Nov 17, 2019 13:34होमपेज › Pune › पार्थ पवारांच्या चालकाचे मुंबईमधून अपहरण 

पार्थ पवारांच्या चालकाचे मुंबईमधून अपहरण 

Published On: Jul 12 2019 2:07AM | Last Updated: Jul 12 2019 1:50AM
शिक्रापूर : वार्ताहर
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव व मावळ लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांच्या गाडीचा चालक मनोज ज्योतीराम सातपुते यांचे मुंबईतून अपहरण करून त्यांना (सुपा, ता. पारनेर, जि. नगर) येथे बेशुद्धावस्थेत सोडून देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. 

अपहरणकर्त्यांनी ‘तू पार्थ पवारांचा ड्रायव्हर का?’ असे म्हणून अपहरण केल्याने कुलाबा (मुंबई) व शिक्रापूर (जि. पुणे) पोलिसही चक्रावले असून, या प्रकरणी मुंबई, पुणे व नगर जिल्हा पोलिस कसून चौकशी करीत आहेत. हा प्रकार दि. 5 व 6 जुलैदरम्यान घडला.

याबाबत चालक मनोज ज्योतीराम सातपुते (वय 26, रा. सणसवाडी, ता. शिरूर, जि. पुणे, मूळ वरुडा, ता. जि. उस्मानाबाद) यांनी शिक्रापूर पोलिसांत फिर्याद दिली आहे. ते पार्थ पवार यांच्या एमएच 42 एएफ 009 या गाडीवर चालक म्हणून काम करतात. दि. 3 जुलै रोजी सातपुते हे पार्थ पवार यांना घेऊन मुंबई चर्चगेटला पोहोचले. त्यांनी दि. 5 पर्यंत आमदार निवास येथे मुक्काम केला. रात्री 8 वाजता मुंबईत कुलाबा बेस्ट डेपोजवळ उभे असताना लाल रंगाची एक ओमनी गाडी सातपुते यांच्याजवळ आली व तू पार्थ पवारांच्या गाडीचा चालक आहेस का? आम्हाला पार्थ यांना वस्तू द्यायची आहे; परंतु आम्हाला त्यांचा पत्ता सापडत नाही, असे सांगून पत्ता सांगण्यासाठी सातपुते यांना गाडीच्या पुढच्या सीटवर बसविले. या गाडीत मागील सीटवर एक इसमही बसलेला होता; मात्र त्यापुढील काहीच आठवत नाही असे सांगून सातपुते यांना शरीरावर काही ठिकाणी मारहाण करून थेट सुपे (ता. पारनेर, जि. नगर) येथे घाटाच्या वर रस्त्याच्या कडेला दि. 6 रोजी सकाळी 8 वाजता सोडून दिले. या वेळी त्यांना छातीवर, पायावर, मनगटावर वस्तूंनी मारहाण झाल्याचे त्यांनी पोलिसांना लिहून दिले आहे. 

दरम्यान, सातपुते यांच्याकडील मोबाईल गहाळ झाला असून, ते एसटी बसने सणसवाडी येथे येऊन खासगी रुग्णालयात दाखल झाल्यावर त्यांनी शिक्रापूर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. अज्ञातांवर अपहरण, मारहाणीचे गुन्हे दाखल करण्यात आले असून, गुन्हा कुलाबा पोलिसांकडे पुढील तपासासाठी वर्ग करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी दिली. याबाबत सातपुते म्हणाले की, ते मुंबई येथे जात असून झालेला प्रकार कशामुळे घडला याबाबत उलगडा झालेला नाही.