Sat, May 25, 2019 22:34होमपेज › Pune › खडकवासला १०० टक्के भरले; पुणे शहराला अतिदक्षतेचा इशारा

खडकवासला भरले; पुण्याला अतिदक्षतेचा इशारा

Published On: Jul 16 2018 7:53PM | Last Updated: Jul 16 2018 7:53PMपुणे : प्रतिनिधी 

साखळी धरणक्षेत्रात सोमवारी दिवसभर मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे खडकवासला धरण १०० टक्के ( १.९७ टीएमसी)  भरले असून, सोमवारी संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत खडकवासला धरणातून  १८ हजार क्युसेसने (विसर्ग) पाणी मुठा नदीत सोडण्यात आले आहे. दरम्यान मुसळधार पाऊस धरणक्षेत्रात सुरूच असून उशीरा २५ ते ३० हजार क्युसेसने पाणी सोडण्यात येईल. त्यामुळे नदीची पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन  नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे असा इशारा खडकवासला धरणाचे कार्यकारी अभियंता पांडुरग  शेलार यांनी दिला आहे. याबरोबर पुणे शहराला अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

संततधारेमुळे पुणे शहर आणि जिल्ह्याला पाणीपुरवठा करणार्‍या चार प्रमुख धरणांपैकी खडकवासला हे धरण १००  टक्के  (१.९७ टीएमसी)भरले आहे. त्यामुळे सोमवारी सकाळी आठ वाजल्यापासून  या धरणातून मुठा नदीत पाणी सोडण्यास सुरूवात झाली आहे. सोमवारी एक वाजेपर्यत  ९ हजार ४१६ क्युसेसने पाणी सोडण्यात आले. सकाळी २ ह्जार, तर साडेपाच वाजेपर्यत १८ हजार क्युसेसने पाणी सोडण्यात आले.  १४ हजार क्युसेसने पाणी सोडण्यात आल्यानंतर नांदेड शिवणे पूल पाण्याखाली गेला. तर टेमघर, खडकवासला, वरसगाव आणि पानशेत या चारही साखळी धरणक्षेत्रात शनिवारपासून मुसळधार पाऊस पडण्यास सुरूवात झाली. 
रविवारी दिवसभर पाऊस पडला. सोमवारी मात्र पावसाचा जोर वाढला. दिवसभर पडलेल्या जोरदार पावसामुळे पानशेत ७७.४० टक्के (८.२४ टीएमसी), टेमघर -४९.५०टक्के ( १.८४ टीएमसी) तर वरसगाव ५०.२९ टक्के (६.४५ टीएमसी)  भरल्याने या चारही धरणामध्ये एकूण सुमारे  १८.५०  टीएमसी (६३.४६ टक्के) पाणीसाठा झाला आहे. या बरोबरच पिंपरी- चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणार्‍या पवना धरणामध्ये ६९.३८  टक्के (५.९७ टीएमसी) भरले आहे .त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहराची  पिण्याच्या पाण्याची गरज भागली आहे. 

सोमवारी अनुक्रमे खडकवासला-३३ मीमी, वरसगाव-९५ मीमी, टेमघर-६९ मीमी, तर पानशेत ५७ मीमी पाऊस पडला आहे. गेल्या वर्षी १६ जुलैपर्यंत चार प्रमुख धरणांत १०.०६  टीएमसी पाणीसाठा होता. यावर्षी  मात्र १८. ५० टीएमसी पाणीसाठा झाला आहे. मागील वर्षी पेक्षा यावर्षी  सुमारे साडेआठ टीएमसी पाणीसाठा जास्त आहे. अशी माहिती जलसंपदा विभागाने दिली. वरसगाव आणि टेमघर या धरणांच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. त्यामुळे या धरणांतील पाणीसाठा  कमी असल्याचे जलसंपदा विभागाने सांगितले. 

उजनी अजूनही कोरडे

सोलापूर आणि परिसराला पाणीपुरवठा करणारे उजनी धरण मात्र अद्यापही कोरडे आहे. या धरणातील उपयुक्त धरणसाठा हा अद्यापही उणे ४.६३ टीएमसी आहे. सोमवारी दिवसभरात  या धरणक्षेत्रात पाऊस पडला नाही. एक जूनपासून आतापर्यंत या धरण भागात सुमारे  २४५   मिलिमीटर पाऊस झाला, अशी माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे.

नदीकाठच्या नागरिकांनी सर्तक रहावे तर  पुणे शहराला अतिदक्षतेचा इशारा 

साखळी धरणक्षेत्रात सध्या मुसळधार पाऊस पडत आहेत. त्यामुळे धरणांमधील पाणीसाठा चांगलाच वाढलेला आहे. खडकवासला धरण १०० टक्के भरले आहे. त्यामुळे या धरणामधून पाण्याचा विसर्ग जोरात सुरू करण्यात आला आहे . पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाल्यास २५ ते ३० हजार क्युसेसने पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे. तसेच पुणे शहराला अतिदक्षेतेचा असा इशारा खडकवासला धरणाचे कार्यकारी अभियता पांडुरंग शेलार यांनी दिला आहे.