Sun, Aug 25, 2019 03:39होमपेज › Pune › शिवनेरीच्या धडकेत खडकी येथे दोन ठार

शिवनेरीच्या धडकेत खडकी येथे दोन ठार

Published On: Jan 30 2018 2:17AM | Last Updated: Jan 30 2018 1:45AMखडकी : वार्ताहर 

मुंबई-पुणे महामार्गावर खडकीत राजा बंगला बसथांब्यावर मुंबईच्या दिशेने जाणार्‍या शिवनेरी बसच्या डिकीचे झाकण अचानक उघडून झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला. ही घटना सहाय्यक पोलिस आयुक्त कार्यालयाच्या जवळ घडली.  दीपक भास्कर सोरटे (54. रा. जानकी अपार्टमेंट, औंध रोड), जॉर्ज आशीर्वादन (51, रा. सरिता अपार्टमेंट, कासारवाडी) अशी मृतांची नावे आहेत. तर आरोग्यदास आरिक स्वामी (62, रा. दर्गा वसाहत, रेल्वे लाईन, खडकी) हे या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी  बसचालक संतोष प्रल्हाद मदने (32, रा. इंदोली, कर्‍हाड, सातारा) याला अटक केली आहे. 

पुणे-दादर ही शिवनेरी बस अंडी उबवणी केंद्राचा सिग्नल ओलांडून पुढे येत असताना गतिरोधकाच्या अडथळ्यामुळे बसची कडेची डिकी उघडली गेली. तेथे बसथांब्यावर बसची वाट पाहत थांबलेल्या या तिघांना त्या डिकीचा पत्रा लागला. बस वेगात असल्याने अचानक उघडलेल्या डिकीबाबत चालकालाही कळले नाही. हा पत्रा त्यांना एवढा जोरात लागला की, तिघे जण गंभीर जखमी झाले. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला, तर स्वामी यांच्यावर बोर्डाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी खडकी पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक एस.भोसले अधिक तपास करीत आहेत.