Fri, Jul 19, 2019 07:10होमपेज › Pune › 'कबीर कला मंच, एल्गार परिषद आयोजकांवर आकसापोटी गुन्‍हे' (व्‍हिडिओ)

'कबीर कला मंच, एल्गार परिषद आयोजकांवर आकसापोटी गुन्‍हे' (व्‍हिडिओ)

Published On: Jan 10 2018 9:21PM | Last Updated: Jan 10 2018 9:20PM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी

एल्गार परिषदेमध्ये कोणत्याही प्रकारची भाषणे अथवा गाणी-पथनाट्ये ही प्रक्षोभक झालेली नाहीत. कोरेगाव भीमा दंगलीनंतर संभाजी भिडे गुरुजी आणि समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्या अटकेची सर्व स्तरातून मागणी होत आहे. मात्र, हे सरकार त्यांना पाठीशी घालून दुसर्‍यावर खापर फोडण्यासाठी तसेच पुर्वग्रहदुषित आणि आकसाने गुन्हे दाखल केले आहेत. हे गुन्हे खोटे असल्याचे एल्गार परिषदेचे आयोजक आणि कबीर कला मंचच्या कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.

एल्गार परिषदेचे आयोजक आणि कबीर कला मंचाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी एस. एम. जोशी सोशलिस्ट फौंडेशनच्या आवारात पत्रकार परिषद घेतली. यावेळी एल्गार परिषदेचे संयोजक आकाश साबळे, भारिप-बहुजन महासंघाचे शहराध्यक्ष प्रा. म. ना. कांबळे, स्वराज अभियानाचे इब्राहिम खान, कबीर कला मंचाचे सागर गोरखे, ज्योती जगताप, रमेश गायचोर, दीपक डेंगळे, किशोर कांबळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. 

एल्गार परिषदेमुळेच कोरेगाव भीमा येथे दुर्घटना घडली असा आरोप केला जात आहे. वास्तविक पाहता हे दोन्ही विषय वेगळे आहेत. राज्यात ३ जानेवारी रोजी जो बंद पाळण्यात आला होता. त्यामध्ये सर्व समाज एक असून काही हिंदुत्ववादी व्यक्तींच्या विरोधातील आक्रोश दिसून आला आहे. शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे आणि समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्या अटकेची सर्व स्तरातून मागणी होत आहे. मात्र, हे सरकार भिडे-एकबोटेंना पाठिशी घालत असून दंगलीचे खापर दुसर्‍यावर फोडण्यासाठी आम्हाला गोवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप एल्गार परिषदेचे संयोजक आकाश साबळे यांनी केला.

आकाश साबळे म्हणाले, कोरेगाव भीमा येथे हिंदुत्ववादी संघटनांनी तेथे दंगली घडवून राज्यातील वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न केला. त्यामागील सूत्रधारांना अटक करण्याऐवजी एल्गार परिषद आणि कबीर कला मंचाला गोवण्याचा प्रयत्न केला जात आहे. परिषदेच्या नियोजनादरम्यान आपल्याला धमक्या येत असल्याचे निवेदन यापूर्वीच पोलिस आयुक्तांना दिल्याचेही त्यांनी सांगितले. एल्गार परिषदेत नक्षलवादी सहभागी झाल्याचा आरोपही पूर्णतः खोडसाळ आहे. आम्ही फुले-शाहू-आंबेडकरी विचारांना मानणारे कार्यकर्ते असून नक्षलवादाचे समर्थन वा प्रसार करत नाही, असेही एल्गार परिषदेच्या संयोजकांनी नमूद केले.

दरम्यान, एल्गार परिषद होऊ नये यासाठी हिंदुत्ववाद्यांनी अखेरपर्यंत प्रयत्न केले. त्यामुळेच कोरेगाव भीमा वाद आणि एल्गार परिषदेचा सूतराम संबंध नाही. वढू गावात संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे यांच्या बैठका झाल्याचे व्हिडीओ असतानाही त्यांना अटक केली जात नाही. सरकारकडून त्यांना पाठिशी घातले जात आहे. त्यामुळेच ३१ तारखेला झालेल्या एल्गार परिषदेविरोधात तब्बल आठ दिवसांनी गुन्हा दाखल केला जात आहे मात्र, संपूर्ण आंबेडकरी जनता एल्गार परिषदेचे संयोजक आणि कबीर कला मंचाच्या कार्यकर्त्यांच्या पाठिशी उभी राहील, असे भारिप-बहुजन महासंघाचे प्रा. म. ना. कांबळे यांनी नमूद केले. भिडे-एकबोटेंना तातडीने अटक करून त्यांची नार्को टेस्ट करावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.