होमपेज › Pune › पत्रकाराला व्यावसायिक दर्जा दिला पाहिजे: न्यायमूर्ती कोकजे

पत्रकाराला व्यावसायिक दर्जा दिला पाहिजे: न्यायमूर्ती कोकजे

Published On: Jul 23 2018 4:27PM | Last Updated: Jul 23 2018 4:27PMपुणे: पुढारी ऑनलाईन

‘पत्रकारीतेतील अपप्रवृत्तीला जबाबदार व प्रतिष्ठित पत्रकारांना उत्तरे द्यावी लागतात. पत्रकारीतेचा सन्मान वाढविण्यासाठी पत्रकाराला व्यावसायिक दर्जा दिला पाहिजे. कायदा करून स्वयंनियमन करणारी व्यवस्था निर्माण करावी. आचारसंहितेचे पालन करता येईल. त्यामुळे पत्रकारांचे स्वातंत्र्य हिरावून न घेता स्वयंनियमनामुळे ते वाढीला लागेल’ असे मत विश्‍व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष माजी न्यायमूर्ती विष्णू कोकजी यांनी व्यक्त केले. 

डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि विश्‍व संवाद केंद्र यांच्या वतीने देवर्षी नारद गौरव पुरस्कार प्रदान समारंभात न्यायमूर्ती कोकजे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळ व परिषदेचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे अध्यक्षस्थानी होते. कार्यवाह डॉ. श्रीकृष्ण कानेटकर, विश्‍व संवाद केंद्राचे अध्यक्ष मनोहर कुलकर्णी व्यासपीठावर उपस्थित होते. 

लोकसत्ताचे निवासी संपादक मुकुंद संगोराम यांना ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र टाईम्स नाशिकचे प्रवीण बिडवे, सांगलीचे उदय देवळेकर, कोल्हापूरचे विनायक पाचलग यांना अनुक्रमे युवा पत्रकार, छात्राचित्रकार व सोशल मीडिया पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पंधरा हजार रुपये, सन्मानचिन्ह असे ज्येष्ठ पत्रकार पुरस्काराचे स्वरूप होते. 

न्यायमूर्ती कोकजे पुढे म्हणाले, ‘इलेक्ट्रानक्स माध्यमांमुळे मुद्रित माध्यमांसमोरील आव्हाने वाढली आहेत. चोवीस तास बातम्यांमुळे मुद्रित माध्यमांमध्ये बातमी मूल्य राहीलेले नाही. वाचकांची रूची भिन्न असते. गती आणि विश्‍वासार्हता कायम राखायची आहे. जाहिराती आणि बातम्यांचे संतुलन ठेवायचे आहे. आजपर्यंत ही आव्हाने समर्थपणे पेलली आहेत. बातम्यांच्या विश्‍लेषणावर भर दिल्यास मुद्रित माध्यमे स्पर्धेमध्ये टिकू शकतील.’

सोशल मीडियावर नियंत्रण आवश्यक आहे. माध्यमांच्या दबाव तंत्रांचा न्यायीक आणि सामाजिक व्यवस्थांवर होणार्‍या परिणामांचे पत्रकारांनी भान ठेवले पाहिजे. या दबाव तंत्रामुळे दोषी व्यक्ती सुटला जातो आणि निर्दोष व्यक्ती पकडला जातो. त्यामुळे शिक्षा होण्याचे प्रमाण कमी होते, अशी मतेही न्यायमूर्ती कोकजे यांनी आपल्या भाषणात नोंदवली.

गेल्या चार दशकात माध्यमांच्या जगात समुद्राएवढा बदल झाला आहे. माध्यमांची व्याप्ती अब्ज पटीने वाढली. विचार, चिंतन, मननासाठी वाचन करून आपले मत बनविले जाते, याला तंत्रज्ञानाने छेद दिला. विकास झाल्यावर काही चांगले घडणे अपेक्षित होते. परंतु वातावरण गढूळ झाले आहे. शब्दांवरील विश्‍वास कमी झाला आहे. माध्यमांनीच आपण न्यायाधीश असल्याचे समजायला सुरूवात केली आहे. हितसंबंधांसाठी काम केले जाते. त्यामुळे खरे काय खोटे काय हे वाचकाला समजत नाही. माहितीला समाज ज्ञान समजतो आहे. ही अधोगती थांबली पाहिजे. ज्ञानी माणसाला विचारांचे विच्छेदन करता येणे आवश्यक आहे. शब्दांवर विश्‍वास वाढावा यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे मत मुकुंद संगोराम यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केले.

मनोहर कुलकर्णी यांनी प्रास्ताविक भाषण केले. आसावरी जोशी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. श्रीकृष्ण कानेटकर यांनी आभार मानले. पुरस्काराचे हे आठवे वर्ष होते.