Wed, Jun 26, 2019 18:22होमपेज › Pune › जेजुरीत सोमवती यात्रेनिमित्त २ लाख भाविकांची गर्दी

जेजुरीत सोमवती यात्रेनिमित्त २ लाख भाविकांची गर्दी

Published On: Apr 16 2018 11:20AM | Last Updated: Apr 16 2018 11:20AM
जेजुरी: नितीन राऊत

महाराष्ट्राचे कुलदैवत आणि बहुजन समाजाचे लोकदेव असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा देवाच्या सोमवती यात्रेनिमित्त सोमवार दि. १६ रोजी दोन लाखांहून अधिक भाविकांनी जेजुरी गडावर देवाचे दर्शन घेतले. सोमवती अमावस्येनिमित्त पहाटे दोन वाजता जेजुरी गडावरून खंडोबा देवाचा पालखी सोहळा मार्गस्थ झाला. यावेळी सदानंदाचा येळकोट.....येळकोट ...येळकोट..जयमल्हार ...असा जयघोष करीत भाविकांनी भंडार्‍याची उधळण केली .पहाटेच्या प्रहरी संपूर्ण जेजुरी गड भंडाऱ्याने न्हावून निघाला.

रविवारी सकाळपासूनच अमवस्या असल्याने देवदर्शनासाठी गडावर भाविकांची मोठी गर्दी दिसून येत होती. रविवारी व सोमवारी गडावर दर्शनासाठी भाविकांची रांगा लागल्या होत्या. रविवारी अमवस्या सुरु होवून सोमवारी सकाळी साडे सात वाजता अमावस्या संपणार असल्याने आणि सूर्य अमवस्या पाहत असल्याने देवाचे मानकरी पालखी सोहळ्याचे खांदेकरी व जेजुरीकर नागरिकांनी सोमवती यात्रेचे नियोजन केले होते. 

सोमवारी पहाटे १ वाजल्यापासूनच जेजुरी गडावर पालखी सोहळ्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होती. पहाटे २ वाजता देवाचे प्रमुख मानकरी राजेंद्र पेशवे, सचिन पेशवे यांनी इशारा दिल्यानंतर पालखी सोहळ्याला प्रारंभ झाला. जेजुरी देवसंस्थानच्यावतीने बंदुकीच्या फैरी झाडून सोहळ्याला सलामी देण्यात आली. मंदिर प्रदक्षिणेनंतर खंडोबा व म्हाळसादेवीची उत्सव मूर्ती पालखीत ठेवण्यात आली. गडावरून सोहळा निघताच हजारो भाविकांनी देवाचे लेण असणाऱ्या पिवळ्या जर्द भंडाराची उधळण करीत खंडेरायाचा जयघोष केला. यावेळी देवसंस्थान विश्वस्तांसह शहरातील अठरापगड जातीधर्मातील समाजबांधव, ग्रामस्थ, पुजारी, सेवेकरी, मानकरी, खांदेकरी उपस्थित होते.

पालखी सोहळ्यासमोर मानाचा पंचकल्ल्यांनी अश्व, छत्रचामरे- अब्दागिरी, घडशीसमाज बांधवांचा सनईचा मंगलमय सूर निनादत होता .जेजुरीकर मानकरी-खांदेकरी पुजारीवर्गाच्या समवेत पालखी सोहळा पायरी मार्गाने बानुबाई मंदिर, नंदिचौक मार्गे  मल्हारगौतमेश्वर -छत्रीमंदिर येथे स्थिरावाला.  शहरातून वाजत गाजत धालेवाडी मार्गे कर्‍हा स्नानासाठी मार्गस्थ झाला. धनगरसमाज बांधवांच्यावतीने पालखीसोहळा मार्गावर लोकर अंथरण्यात आली होती. वजनाने प्रचंड जड असणारी पालखी सुमारे पाच किलोमीटर खांद्यावर पेलवत पालखी सोहळा पहाटे ६  वाजता  कर्‍हानदीतीरी पापनाशतीर्थावर (रंभाई शिंपीन कट्टा ) येथे पोहचला. खंडोबा- म्हाळसादेवीच्या उत्सवमूर्तींना दहीदुधांचा विधिवत अभिषेक घालून उत्सव मूर्तींना पहाटे साडे सहा वाजता 
कर्‍हास्नान घालण्यात आले. यावेळी हजारो भाविकांनी उत्सवमूर्तींबरोबर स्नानाची पर्वणी लुटली. महारती झाल्यानंतर परतीच्या मार्गावर धालेवाडीकरांचा मान-पान घेत-दवणेमळा येथे फुलाईमाळीन कट्ट्यावर विसावा घेत सोहळा जेजुरी येथील जानाईमंदिर येथे स्थिरावला.

अमवस्या संपल्याने व प्रतिपदा सुरु झाल्याने सकाळी १० वाजता पालखी सोहळा शहरातून वाजत गाजत जेजुरी गडावर घेऊन जाण्यात आला. रोजमुरा ( ज्वारीच्या धान्याला उत्सव मूर्तींचा स्पर्श करून समृद्धी साठी वाटण्यात येणार प्रसाद ) वाटून सोमवती यात्रेची सांगता झाली. जेजुरी देवसंस्थानच्या वतीने पहाटेच्या वेळी पालखी मार्गावर लाईटची व्यवस्था नाष्टा चहापानाची व्यवस्था करण्यात आली होती. प्रमुख विश्वस्त राजकुमार लोढा विश्वस्त शिवराज झगडे,संदीप जगताप,पंकज निकुडे व्यवस्थापक दत्तात्रय दिवेकर  यावेळी उपस्थित होते. श्री खंडोबा पालखी सोहळा समितीचे अध्यक्ष गणेश आगलावे सर्व पदाधिकारी मानकरी खांदेकरी,पुजारी सेवक वर्ग ग्रामस्थांनी या सोहळ्याचे नियोजन केले.

सोमवतीयात्रे निमित्त होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता पोलीस प्रशासनाकडून यात्रेपुर्वीच नियोजन करण्यात आले होते. शहरात वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला होता. कऱ्हा नदीवर वाहनांची पार्किंग व्यवस्था चांगली ठेवण्यात आल्याने वाहतुकीची कोंडी झाली नाही. जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डी. एस. हाके, रामदास शेळके, रामदास वाकोडे, पोलीस उपनिरीक्षक राजेश मालेगावे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

शहरातील मुख्यमार्गांवर खेळणी,प्रसादपुडे,भंडारा-खोबरे,  हार -फुले नारळ,मेवामिठाईची दुकाने सजली होती .