Fri, Jul 19, 2019 01:06होमपेज › Pune › भाजपकडून जनतेचा भ्रमनिरास

भाजपकडून जनतेचा भ्रमनिरास

Published On: Jun 02 2018 2:03AM | Last Updated: Jun 02 2018 12:54AMपिंपरी : प्रतिनिधी

भाजपने सत्तेत येण्यासाठी जनतेला विविध आश्‍वासनांची भुरळ घातली. मात्र, ती पूर्ण करता न आल्यामुळे जनतेचा भ्रमनिरास झाला. त्यातून त्यांच्यामध्ये अस्वस्थता निर्माण झाली. त्याचा प्रत्यय देशभरात झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपच्या विरोधात गेलेल्या मतदारांच्या कौलातून पाहावयास मिळाला. महागाई गगनाला भिडली. देशात पहिल्यांदा शेतकर्‍यांवर संप करण्याची वेळ आली.

शेतकर्‍यांना या सरकारमध्ये कोणीच वाली नाही. त्यामुळे आत्महत्या वाढल्या. पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या दरातून जनतेची लूट भाजपचे सरकार करीत आहे, असे आरोप राष्ट्रवादी काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी भोसरीत शुक्रवारी केले.

भोसरी येथील अंकुशराव लांडगे नाट्यगृहामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी आ. विलास लांडे, महापालिका विरोधी पक्षनेते दत्ता साने, नगरसेवक दीपक मानकर आदी उपस्थित होते.

पाटील म्हणाले, मोदी लाटेमुळे भाजपचे खासदार, आमदार निवडून आले. त्यामुळे शहरात भाजप वाढत आहे, असे म्हणणे चुकीचे आहे.  सत्तेत येण्यासाठी भाजपने जनतेला भरमसाट आश्‍वासने दिली. परंतु एकही आश्‍वासन ते पूर्ण करू शकले नाहीत. 

राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्यांची घुसमट सुरू असल्याचे त्यांच्या बोलण्यातून जाणवत आहे.  त्यातील अनेकजण माझ्या संपर्कात आहेत. त्यांच्या गाठीभेटींना मी महत्व दिले आहे. त्यापैकी अनेकजण पुन्हा स्वगृही येण्यासाठी इच्छुक आहेत. परंतु पक्षाच्या अडचणीच्या काळात पक्षासोबत राहिलेल्यांना विचारात घेऊन त्यांच्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल, असेही पाटील यांनी सांगितले.

राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र आल्यास यश निश्‍चित
भंडारा-गोंदिया पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराने भाजपच्या उमेदवारावर मोठा विजय मिळविला. सत्ताधारी केंद्रीय नेतृत्वाने विकासात्मक प्रकल्प बासनात गुंडाळल्यामुळे सत्ताधार्‍यांना जनतेने नाकारले आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकदिलाने काम केल्यामुळे हे यश मिळाले. त्यामुळे भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र आल्यास यश निश्‍चित मिळणार असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी व्यक्त केले.