होमपेज › Pune › पुण्यासाठी जळगावातून येणार ३९ आधार नोंदणी यंत्रे

पुण्यासाठी जळगावातून येणार ३९ आधार नोंदणी यंत्रे

Published On: Mar 15 2018 1:20AM | Last Updated: Mar 15 2018 12:38AMपुणे : प्रतिनिधी 

शाळांसह विविध शासकीय कामांसाठी आधार क्रमांक मागविला जात आहे. परंतु, आधार नोंदणी आणि दुरुस्तीसाठी आवश्यक असलेल्या यंत्रांची संख्या अपुरी असून, जिल्हा प्रशासनाने 100 आधार नोेंदणी यंत्रांची मागणी केली होती. परंतु त्यावर कोणतेच उत्तर न आल्याने पुन्हा एकदा तो प्रस्ताव राज्याच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाला सादर करण्यात आला आहे. तर दुसरीकडे जळगाव जिल्ह्यात अतिरिक्त ठरत असलेली 39 आधार नोंदणी यंत्रे पुण्यासठी मिळणार आहेत, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

केंद्र व राज्य सरकारने विविध कामांसाठी आधार कार्ड संलग्न करणे बंधनकारक केले आहे. शहरात आधार नोंदणी झालेल्या नागरिकांची संख्या मोठी असली तरी कार्डातील नावात, पत्ता यामध्ये चुका झालेल्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. नागरिकांची होणारी अडचण लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने राज्याच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाकडे नवीन 100 आधार नोंदणी यंत्रे खरेदीचा प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाला कोणतेच उत्तर न मिळाल्याने पुन्हा एकदा प्रस्ताव सादर केला आहे. 

पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि जिल्ह्यात बुधवारी (दि.14) 126 आधार नोंदणी केंद्रे सुरू होती. सध्या आधार नोंदणी केंद्रावर नवीन नोंदणी करण्यासाठी येणार्‍यांची संख्या कमी आहे. मात्र, दुरुस्तीसाठी येणारे सर्वाधिक  नागरिक आहेत. त्यामुळे पुणे महापालिकेने 40 प्रिंटर्स घेण्याचा इरादा जाहीर केला होता. मात्र, त्याची अध्यापही पूर्तता झालेली नाही. आधार नोंदणी यंत्रांची मागणी आणि चालकांची संख्या अपुरी आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने चालक आणि यंत्रे उपलब्ध झाल्यास सर्वप्रथम तहसील कार्यालय, पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या मुख्यालयात केंद्रे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातच आधार क्रमांक संलग्नतेला मुदतवाढ मिळाल्याने नागरिकांनी सुटकेचे निःश्‍वास सोडला आहे.