Thu, Apr 25, 2019 13:24होमपेज › Pune › 'जलसंपदा'मधील ९ कर्मचार्‍यांचे 'तो' आदेश रद्द होईपर्यंत उपोषण

'जलसंपदा'मधील ९ कर्मचार्‍यांचे 'तो' आदेश रद्द होईपर्यंत उपोषण

Published On: Dec 08 2017 3:36PM | Last Updated: Dec 08 2017 3:35PM

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनिधी

महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाच्या दापोडीतील यांत्रिकी कार्यशाळेतील नऊ कामगारांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. शुक्रवारी दि. ८ पासून उपोषणास प्रारंभ करण्यात आला आहे. कामानुसार हुद्दा आणि हुद्द्यानुसार वेतनश्रेणीबाबत दिलेले आदेश रद्द करावेत अशी या कामगारांची मागणी आहे.

यासंदर्भात कार्यशाळा जलसंपदा विभाग बचाव कृती समितीने जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना या निवेदन दिले होते. परंतू त्यावर कुठलाच निर्णय न झाल्याने कामगारांनी शुक्रवारपासून उपोषणास सुरूवात केली आहे. कार्यशाळेतील संजय पाटील, मेहबूब बागवान, अनिल पोतदार, लहू उंडे, हणमंत बवले, मधुकर खळदे, सुरेश गायकवाड, दत्तात्रय साष्टे आणि भाऊसाहेब जाधव या कर्मचार्‍यांना कामानुसार हुद्दा आणि हुद्द्यानुसार वेतनश्रेणी या योजनेअंतर्गत वरिष्ठ पदाचा हुद्दा व वेतनश्रेणी दिली; परंतू या पदोन्नतीनुसार सध्या मिळत असलेला पगार आणि या योजनेच्या लाभानंतर मिळणारा पगार यामध्ये फरक पडलेला नाही. केवळ हुद्दा बदलण्यात आला आहे. त्याशिवाय शासकीय सेवेची वयोमर्यादा 60 वर्षापासून 58 वर्षे करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ रद्द करण्याबाबत या कर्मचार्‍यांनी रितसर अर्ज करण्यात आला. सोबत नांदेड येथील यांत्रिकी मंडळांतर्गत येणार्‍या काही कर्मचार्‍यांनी संबंधित योजनेचा लाभ रद्द करून घेतलेल्या आदेशाची प्रतही सादर केली आहे.

त्याचप्रमाणे विभागीय कार्यालयाने यांत्रिकी मंडळ, पुण्याचे अधीक्षक अभियंता यांना शिफारसही करण्यात आली मात्र, त्यांनी याला नकार दिला आहे. याबाबत स्‍पष्ट भूमिका कुणाचीच नसल्याने कर्मचार्‍यांनी उपोषण केले आहे. कामानुसार हुद्दा आणि हुद्द्यानुसार वेतनश्रेणी आदेश रद्द होईपर्यंत हे उपोषण सुरू राहणार असल्याचा इशारा कर्मचार्‍यांनी दिला आहे.