Fri, Apr 26, 2019 03:23होमपेज › Pune › क्षयरोगमुक्‍त भारत - एक कडवे आव्हान!

क्षयरोगमुक्‍त भारत - एक कडवे आव्हान!

Published On: Mar 24 2018 1:52AM | Last Updated: Mar 24 2018 12:11AMपुणे : प्रतिनिधी

क्षयरोग निर्मुलनाचे ध्येय भारताने 2025 पर्यंत गाठण्याचा संकल्प केला आहे. मात्र ते ध्येय गाठण्यात अनंत अडचणी आहेत. हे ध्येय पूर्ण करण्यासाठी ठोस धोरणे आणि आधुनिक वैद्यकशास्त्राला आयुष उपचारपध्दतीची जोड देणे आवशक असल्याचे मत या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्‍त करतात. 

क्षयरोग हा जुनाट आजार आहे. भारतात दरवर्षी 28 लाख नवीन क्षयरोगाचे रुग्ण आढळतात. दर तीन मिनिटाला दोन क्षयरुग्ण मरण पावतात. म्हणजेच चार लाखाहून अधिक रुग्ण वर्षाला मरण पावतात. यापैकी बहुतांश रुग्ण 20 ते 45 वयोगटातील आहेत. या रुग्णांच्या अकाली निधनाने कुटूंबाची वाताहत होते. सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत 90 टक्के क्षयरुग्ण शोधण्याचे आणि त्यातील 90 टक्के बरे करण्याचे उदिदष्ठ ठेवण्यात आले आहे. याचा अर्थ 100 टक्के रुग्ण आपण बरे करू शकत नाहीत, हे शासनानेही मान्य केले आहे.

नवीन क्षयररुग्णांपेकी 2.3 टक्के तर जुन्या रुग्णांपैकी 12 ते 17 टक्के रुग्ण औषधांना प्रतिरोध असलेले (मल्टी ड्रग रेजिस्टंट) आढळून येतात. आज अशा रुग्णांची संख्या देशात 1 लाख 47 हजार इतकी प्रचंड आहे. नवीन क्षयरोग असलेल्यांना उपचारासाठी खर्च हा प्रतिरुग्ण एक हजार तर ‘एमडीआर’ रुग्णाचा खर्च हा प्रतिरुग्ण एक लाख इतका प्रचंड आहे. ‘एमडीआर’मधील 30 ते 40 टक्के रुग्ण उपचारादरम्यान मरण पावतात तर उरलेले ‘एक्सडीआर’ मध्ये जातात आणि त्यांचा मृत्यू होतो. 
मधुमेहाची वाढती समस्या आणि एचआयव्ही बाधित रुग्णांची रोगप्रतिकारक क्षमता कमी होते. त्यांची संख्या जास्त असल्याने हे निर्मुलन करण्यात अडकाठी येउ शकते. तसेच क्षयरोग 100 टक्के बरा होईल अशी प्रभावी औषधे व लसही उपलब्ध नाही.  ‘एमडीआर’ आणि ‘एक्सडीआर’ रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यांच्यापासून मोठया प्रमाणात प्रसार होत आहे. आधुनिक शास्त्रात त्याला समाधानकारक उपचार नाहीत. आयुर्वेदातील वासाघृत, पिंपळी रसायण, वमन, उपचाराने एमडीआर रुग्ण बरे होतात. पण त्यावर क्‍लिनिकल ट्रायल होणे आवशक आहे. सध्या 50 टक्यांपेक्षा अधिक रुग्ण खासगी डॉक्टरांकडे उपचार घेतात तसेच त्यांनी रुग्णांची संख्या शासनाला कळविणे आवशक आहे पण ते होताना दिसत नाही. तसेच त्यांच्याकडून उपचारांचा काटेकोरपणा पाळला जाईल असे नाही. यामुळे एमडीआर रुग्णांची वाढ होण्याची शक्यता असल्याचे मत क्षयरोग व कुष्ठरोग विभागाचे माजी सहसंचालक मेजर डॉ. प्रदीप गायकवाड यांनी व्यक्‍त केले. 

एमडीआर रुग्णांच्या निदानाच्या सोई केवळ मोठया रुग्णालयांत उपलब्ध आहेत. तसेच सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत बरीचशी कर्मचा-यांची पदे कंत्राटी असतात. त्यांना वेळेवर पगार मिळणे, निदानसेवा वाढविणे यासाठी निधीवाढ होणे आवशक आहे. त्याचबरोबर 15 दिवसांपेक्षा अधिक खोकला असल्यास थुंकीची तपासणी करणे, रुग्णांनी इतस्त न थुंकने, खोकतांना-शिंकताना रुमाल वापरणे आवशक आहे. 

आयुष उपचारपध्दतीचा समावेश आवशक

भारत सरकारने आयुष उपचार पध्दतीचा सार्वजनिक आरोग्यसेवेत समावेश करण्याचा निर्णय घेतला पण आयुष निदान, संप्राप्ती व उपचारपध्दतीचा गांभीर्याने उपयोग करणे आवशक आहे. क्षयरोगाची समस्या दुर करण्यासाठी आधुनिक शास्त्राबरोबरच त्याला आयुर्वेदाची जोड दिल्यास त्याचा निश्‍चित फायदा होउ शकेल. दिनचर्या आणि ॠतुचर्या यांचे पालन करून योग्य पोषण व रोगप्रतिकारकक्षम शरीरसंपदा निर्माण करणे हेच क्षयरोगाच्या निर्मुलनाचे मुख्य अस्त्र ठरेल.  - वैद्य सरिता गायकवाड, सहायक संचालक आयुष, पुणे