होमपेज › Pune › भाजपात मूलचंदानींचे वाढतेय प्रस्थ

भाजपात मूलचंदानींचे वाढतेय प्रस्थ

Published On: May 01 2018 1:22AM | Last Updated: May 01 2018 12:39AMपिंपरी : नंदकुमार सातुर्डेकर

पिंपरी कॅम्पातील राजकारणात कायम चर्चेत राहिलेले , काँग्रेस -शिवसेना -भाजप असा राजकीय प्रवास केलेले माजी नगरसेवक अमर मुलचंदानी यांचे प्रस्थ  शहर भाजपमध्ये चांगलेच वाढले आहे. पिंपरी चिंचवड महापालिका स्थायी समिती अध्यक्षपद निवडणूक  तसेच क्षेत्रीय कार्यालय स्वीकृत सदस्य निवडणुकीत मुलचंदानी यांनी महत्वपूर्ण भूमिका पार पाडल्याने त्यांची पालिका वर्तुळात चर्चा आहे. मात्र, या सगळ्या घडामोडीत आ. लक्ष्मण जगताप यांचे उजवे हात अन् चाणक्य मानले जाणारे शहर सरचिटणीस सारंग कामतेकर शांत का ? असा प्रश्न राजकीय निरीक्षकांना पडला आहे.

लोकसभा निवडणुकीत आमदार लक्ष्मण जगताप यांनी राष्ट्रवादीची उमेदवारी नाकारली. शेकापच्या तिकिटावर व मनसेच्या पाठिंब्यावर निवडणूक रिंगणात उडी घेतली ; मात्र मोदी लाटेत शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांच्याकडून ते पराभूत झाले. पराभवातून धडा घेत त्यांनी विधानसभेला भाजपचा झेंडा हाती घेतला व चिंचवडमधून विजय मिळवला . पुढे पक्ष शहराध्यक्षपदही त्यांच्याकडे चालत आले. महापालिका निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने राष्ट्रवादीला पराभवाची धूळ चारली.  128  पैकी 77 जागा जिंकून निर्विवाद बहुमत मिळविले. या सर्व राजकारणात सारंग कामतेकर यांनी त्यांची पाठराखण केली. त्याबदल्यात कामतेकर यांना भाजपचे शहर सरचिटणीसपद ,सीमा सावळे यांना स्थायी समितीचे अध्यक्षपद मिळाले ; मात्र सावळे यांचा स्थायी अध्यक्षपदाचा कार्यकाल संपल्यापासून कामतेकर शांत आहेत. महापालिकेत ते फारसे फिरकतही नाहीत.

कामतेकर यांची जागा माजी नगरसेवक अमर मुलचंदानी यांनी घेतली आहे. महापालिका स्थायी समिती अध्यक्षपदासाठी शीतल शिंदे, विलास मडीगेरी, राहुल जाधव यांची नावे स्पर्धेत असताना आ.लक्ष्मण जगताप यांच्या समर्थक ममता गायकवाड यांचे नाव मुलचंदानी यांनी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे फिल्डिंग लावून निश्चित करून घेतले. नुकत्याच झालेल्या महापालिका क्षेत्रीय कार्यालय स्वीकृत सदस्य निवडणुकीतही मुलचंदानी यांनी लक्ष घातले. आपले समर्थक राजू सावंत यांची अ क्षेत्रीय कार्यालय स्वीकृत सदस्यपदी वर्णी लावून घेतली. आमदार लक्ष्मण जगताप यांचे मित्र मानले जाणार्‍या अमर मुलचंदानी यांचे पिंपरी चिंचवड शहर भाजपमध्ये प्रस्थ वाढत असल्याची पालिका वर्तुळात चर्चा आहे.

Tags : Pimpri, increasing, question,  BJP