Wed, Aug 21, 2019 14:47होमपेज › Pune › विद्यापीठात प्राध्यापक संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न

विद्यापीठात प्राध्यापक संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न

Published On: May 03 2018 1:31AM | Last Updated: May 03 2018 1:25AMपुणे : प्रतिनिधी 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 58वा महाराष्ट्र दिन ध्वजारोहण करून साजरा करण्यात आला. कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी ध्वजारोहण केल्यावर उपस्थित विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मान्यवरांना मार्गदर्शन केले. विद्यापीठाच्या परंपरेनुसार कामगार दिनाचे औचित्य साधून शिक्षकांची संख्या वाढवण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन कुलगुरू डॉ. करमळकर यांनी केले.
डॉ. करमळकर म्हणाले, पुरोगामी महाराष्ट्राची प्रतिमा घडवण्यासाठी संपूर्ण राज्यांतील विविध विभागांचा वाटा आहे. सर्व विभागांनी एकत्रितपणे केलेल्या कामांमुळे भारत राष्ट्र म्हणून सातत्याने विकास करीत आहे. राज्याच्या विकासात शिक्षण, राजकीय, सामाजिक क्षेत्राचा वाटा महत्त्वाचा आहे. विचार, साहित्य, संत परंपरा यामुळे सर्वांगीण विकासाचे स्वप्न साकार झाले आहे. विद्यापीठ पुढील वर्षी 70 वर्षे पूर्ण करीत आहे. त्यामुळे आणखी मोठी आव्हाने विद्यापीठाने स्वीकारण्याचे धोरण अवलंबले आहे.

कुलगुरू पुढे म्हणाले की, शिक्षणाच्या क्षेत्रात विद्यापीठाने मोठी झेप घेतली आहे. यामध्ये एनआयआरएफच्या रँकिंकमध्ये झालेली सुधारणा ही आश्वासक गोष्ट आहे. त्याच वेळी तीन जिल्ह्यांमधील शैक्षणिक विकासाची सर्वांगीण आखणी करण्याचे ध्येयदेखील आहे. पुण्याइतकेच लक्ष पुढील काळात नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांकडे दिले जाईल. विद्यापीठाला स्वायत्तता प्राप्त झाल्याने इतर महाविद्यालयांना स्वायत्तता देण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहितीही त्यांनी दिली. यासाठी सर्व स्तरावरून प्रयत्न केले जात आहेत. अशी पुष्टी जोडताना ते म्हणाले की, नॅकच्या मानांकनाच्या आधारे विद्यापीठाच्या प्रगतीत महत्त्वाचे टप्पे पार केले जातील. यात संंशोधन पार्कची उभारणी, दूरशिक्षण केंद्र (डिस्टन्स इज्युकेशन) यांची उभारणी केली जाईल. हा विद्यापीठ आणि विद्यार्थी जोडणारा नवा दुवा असेल.ध्वजारोहण समारोह करिता प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. अरविंद शाळीग्राम, विविध विभागांचे अभिष्ठाता डॉ. प्रफुल्ल पवार, डॉ. दीपक माने, डॉ. विजय खरे इत्यादी आणि विविध महाविद्यालयांचे प्राध्यापक, विद्यापीठ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

Tags : Pune,  increase,  number, professors, university