Tue, Apr 23, 2019 07:34होमपेज › Pune › पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये ६३ हजार वाहनांची खरेदी

पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये ६३ हजार वाहनांची खरेदी

Published On: Feb 20 2018 1:55AM | Last Updated: Feb 20 2018 12:39AMपुणे : नवनाथ शिंदे

शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीत नसल्यामुळे नागरिकांकडून खासगी वाहन खरेदीला पसंती दिली जात आहे. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये अवघ्या 50 दिवसांत तब्बल 63 हजार वाहनांच्या खरेदीची नोंद आरटीओत झाली आहे. त्यामध्ये सर्वाधिक 40 हजार 402 दुचाकी आहेत.  1 जानेवारी ते 19 फेब्रुवारीदरम्यान पुणे शहरात 39 हजार वाहनांची खरेदी नागरिकांनी केली आहे, तर पिंपरी-चिंचवडमध्ये 24 हजार वाहनांच्या खरेदीला नागरिकांनी  प्राधान्य दिले आहे. 

स्मार्ट शहराकडे वाटचाल करणार्‍या शहरात दुचाकींच्या खरेदीचा वेग मोठ्या प्रमाणावर वाढत चालला आहे. त्यामुळे ठिकठिकाणी वाहतुकीचा वेग मंदावत आहे. विशेषतः शहराच्या मध्यवर्ती भागातून उपनगरांमध्ये कामाला जाणार्‍या चाकरमान्यांना दरदिवशी वाहतूक कोंडीचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. आरटीओ कार्यालयाच्या नोदींनुसार पुणे शहरात फक्त 50 दिवसांमध्ये 39 हजार वाहनांची खरेदी करण्यात आली आहे. त्यामध्ये सर्वाधिक 24 हजार 722 दुचाकींची संख्या आहे, तर चारचाकी वाहनांची आकडेवारी 8 हजार 429 एवढी आहे. तसेच तीनचाकी वाहने व रिक्षा मिळून 2 हजार 549 वाहनांची भर रस्त्यावर पडली आहे. वाहतूक संवर्गातील 5 हजार 394 वाहन खरेदीला नागरिकांनी पसंती दिली आहे. दिवसाला शहरात 780 वाहनांची खरेदी करण्यात आली आहे.  गेल्या काही वर्षांच्या तुलनेत दुचाकींची खरेदी करण्याचा वेग दुपटीने वाढल्याने सायकलींचे शहर दुचाकींचे झाले असल्याचे चित्र सर्रासपणे दिसून येत आहे.

राज्यातील सर्वाधिक मोठी उद्योगनगरी असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्येही 1 जानेवारी ते 19 फेब्रुवारीदरम्यान 50 दिवसांच्या कालखंडात 23 हजार 453 वाहनांची भर नव्याने रस्त्यावर पडली आहे. त्यामध्ये सर्वाधिक 15 हजार 680 दुचाकींचा आकडा आहे, तर चारचाकी वाहनांची संख्या 5 हजार 194 आहे. तसेच वाहतूक संवर्गातील वाहनांची संख्या 2 हजार 527 आहे. आरटीओ कार्यालयाच्या नोंदीनुसार दिवसाला 470 वाहनांची खरेदी नागरिकांनी केली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात दुचाकी  आणि चारचाकी वाहन खरेदीचा आलेख उंचावल्याने वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका होणे दुरापास्त झाले आहे.