Wed, Jul 17, 2019 10:16होमपेज › Pune › पुण्यात रात्रीही 'पे ऍण्ड पार्क'

पुण्यात रात्रीही 'पे ऍण्ड पार्क'

Published On: Mar 20 2018 5:23PM | Last Updated: Mar 20 2018 5:23PMपुणे : प्रतिनिधी

शहरातील खासगी वाहनांना रोखण्यासाठी आणि वाहतूक कोंडीचा तिढा सोडविण्यासाठी महापालिकेने संपुर्ण शहरात 'पे ऍण्ड पार्क' योजना तयार केली आहे. यासाठी प्रशासनाने पार्कींग धोरण तयार केले असून या धोरणास उपसूचनेसह स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. त्यामुळे लवकरच शहरातील रस्त्यांवर दिवस आणि रात्रीच्या वेळीही 'पे ऍण्ड पार्क'ची अंमलबजावणी केली जाणार आहे. या धोरणामुळे पार्कींगच्या दरात दुपटीपेक्षा जास्त वाढ होणार आहे.  

शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महापालिका प्रशासनाने झोन तयार करून पार्कींगचे धोरण तयार केले आहे. या धोरणानुसार शहरातील प्रत्येक रस्त्यांचा अभ्यास करण्यात आला आहे. त्यात रस्त्यावरील वाहनांची संख्या, नागरिकांची रहदारी व गर्दी विचारात घेऊन त्यानुसार पे ऍन्ड पार्कचे झोन निश्‍चित करण्यात आले आहेत. अ, ब, क अशा पध्दतीने हे झोन तयार करण्यात आले आहेत. त्यामध्ये अ झोनमध्ये कमी वर्दळ पार्किंग, ब मध्ये तीव्र वर्दळ आणि क मध्ये अती तीव्र अशी विभागणी करण्यात आली आहे. त्यानुसार पार्किंगचे दर ठरवण्यात आले आहेत.

दुचाकीला रस्त्यावरील पार्किंगसाठी अ भागासाठी 10 रुपये तासाला आकारण्यात येणार आहे. तर क भागासाठी 20 रुपये आकारण्यात येणार आहेत. तर चारचाकी वाहनांसाठी प्रति तासासाठी 50 आणि 100 रुपये अशा पध्दतीचे शुल्क आकारण्यात येणार आहेत.

रात्रीच्या वेळेस अनेक वाहने रस्त्यावर लावण्यात येतात. पेठांमधील काही भागांमध्ये पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे नागरिकांवर ही वेळ येते. त्यामुळे रात्रीच्या वेळी सुध्दा रस्त्यावर पे ऍन्ड पार्क धोरण राबविले जाणार आहे. त्याचा फटका सोसायट्यांमध्ये पार्किग नसलेल्यांना बसणार आहे. दरम्यान शहरातील सर्व रस्त्यांवर पे ऍण्ड पार्क योजना राबविल्यास रस्त्यावरील खासगी वाहनांची संख्या कमी होईल, असा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. तो कितपत योग्य आहे, हे येणार्‍या काळातच समजणारा आहे. दरम्यान पुढील पंधरा वर्षात पालिकेला या माध्यमातून 3000 कोटी रुपये पालिकेच्या तिजोरीत जमा होणार आहेत.  

पालिका प्रशासनाने तयार केलेल्या पार्कींग धोरणाचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवला होता. स्थायीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीमध्ये प्रतितास १० रुपये वरून ७ रुपये, आणि निवासी क्षेत्रातील राज्याच्या पार्कींगसाठी एका रात्रीच्या शुल्कात कपात करण्यासह शहरातील  वाडे, जुन्या इमारती, वसाहती, समाविष्ट गावांमधील जुन्या इमारती या ठिकाणी रात्रीच्या वेळी आकारले जाणारे २५ रुपये शुल्क ५ रुपये करावे, या उपसूचनेसह या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली. 

आयुक्तांनी मुख्यमंत्र्यांकडे सेटींग लावल्याची चर्चा  

पार्किंग धोरण मंजूर करण्यासाठी पालिका आयुक्त कुणाल कुमार हे अग्रही होते. हे धोरण मंजुर केले जात नसल्याने ते नाराज मनस्थितीत असल्याची चर्चा पालिका अधिकाऱ्यामध्ये होती. पार्किंग धोरण मंजुर केल्याशिवाय ते आयुक्त पदाचा पदभार सोडणार नाहीत, अशीही चर्चा पालिका वर्तुळात होती. स्थायी समितीच्या बैठकीच्या पार्श्वभूमिवर आयुक्तांनी मुख्यंमंत्र्यांकडे सेटींग लावली. स्थायी समितीला हा विषय पुढे ढकलायचा होता, मात्र मुख्यमंत्र्यांचा फोन आल्याने हे धोरण मंजुर करण्यात आल्याचे पालिकेत बोलले जात होते.

Tags : pune, pay and park, system, night, pune news, pune municipal corporation