Mon, May 25, 2020 19:42होमपेज › Pune › पुण्यात कोरोनाचा गुणाकार; मृतांचा आकडा २६ वर

पुण्यात कोरोनाचा गुणाकार; मृतांचा आकडा २६ वर

Last Updated: Apr 10 2020 1:15PM
पुणे : पुढारी वृत्तसेवा 

पुणे जिल्ह्यामध्ये कोरोनाचे नवीन १५ रूग्ण शुक्रवारी आढळून आले आहेत. पुणे शहरात आता कोरोनाग्रस्तांची संख्या १९१ इतकी झाली आहे, तर जिल्ह्यात एकूण रुग्ण २२४ झाले आहेत. तर ससून रुग्णालयात २७ वर्षीय कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्याने येथील मृतांचा आकडा २६ वर पोहोचला आहे.

बारामतीमध्ये एकाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. पुण्यात कोरोनाचा गुणाकार सुरू झाल्याचे संकेत मिळत आहेत. 

प्रशासनाने गेल्या महिनाभरात शहरातील बहुतेक व्यवहार बंद केले असले, तरी या आठवड्यात रुग्णांची आणि बळींची संख्या वेगाने वाढू लागल्याने पुणे अक्षरशः हादरले आहे. रस्ते निर्मनुष्य झाले आहेत. केवळ एका आठवड्यात दीडशे नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर २५ जणांचे बळी गेले आहेत. 

महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यासंदर्भात दैनिक ‘पुढारी’शी बोलताना काल (ता.०९) म्हणाले की, पुणे शहर कोरोना साथीच्या तिसर्‍या टप्प्यात प्रवेश करत असल्याचे संकेत आहेत. या टप्प्यातील प्रवेश रोखण्यासाठी लोकांनी घरीच बसले पाहिजे. सामाजिक अंतर पाळले पाहिजे. किरकोळ कारणे सांगत लोक रस्त्यावर येत आहेत. 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विभागातील पुणे महानगरपालिका क्षेत्रामधील एकूण ३५ चौरस किमी क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. तर राज्यातील राज्यातील कोरोना बाधित संख्या १३८० झाली आहे. देशातील कोरोना बाधितांचा आकडा ६ हजार ८३५ वर गेला आहे. आतापर्यंत १६९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.