पिंपरी : प्रतिनिधी
संघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा लागू करावी; तसेच चिंचवड येथील प्रिमियर कंपनीतील कामगारांचे प्रश्न सोडवावेत, या विषयावर कामगार मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांची भेट घेऊन कष्टकरी संघर्ष महासंघाच्या शिष्टमंडळाने निवेदन देऊन चर्चा केली. यावेळी प्रिमियर कामगारांबाबत आठ दिवसांत अहवाल मागवून कार्यवाही करू, असे आश्वासन मंत्र्यांनी दिले, अशी माहिती महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते यांनी दिली.याबाबत दै. ‘पुढारी’ मध्ये प्रीमियर कंपनी कामगारांच्या मागण्यांबाबत वारंवार सविस्तर वृत्त दिले होते. त्याची दखल घेत हे आश्वासन देण्यात आले.
कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, कार्याध्यक्ष राजू बिराजदार, उमेश डोर्ले, मधुकर वाघ, ओमप्रकाश मोरया, दिनेश राठोड, जयंत चव्हाण, उमेश साळवी आदी यावेळी उपस्थित होते.
संघटनेच्या वतीने कामगार मंत्र्यांसमोर कामगारांच्या प्रश्नांची गार्हाणी मांडली. यामध्ये प्रीमिअर कंपनीतील सर्व कामगार कंपनीच्या प्रगतीसाठी परिश्रम घेत आहेत; मात्र कंपनी गेल्या अनेक वर्षांपासून कामगारांचे वेतन देत नाही. मुद्दाम सहा महिने, आठ महिने तर कधी वर्षभर वेतन दिले जात नाही. कामगारांना जाणीवपुर्वक त्रास दिला जातो. कंपनीची आर्थिक स्थिती भक्कम असतानाही वेतन देण्यास टाळाटाळ केली जात आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन केले जात नाही. वेतन न मिळाल्याने, आर्थिक विवंचनेत कामगार सापडला आहे. कामगाराची परिस्थिती नाजूक असून दोन वेळच्या जेवणाचे अवघड झाले आहे. अनेकांचे कर्जाचे हप्ते थकलेले आहेत. कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाची फी भरणे अवघड झाले आहे. आर्थिक विवंचनेत कामगारांना टाकून व्यवस्थापन अन्याय करत आहे. कामगार मंत्र्यांनी लक्ष घालून व्यवस्थापन व कामगारांची बैठक बोलावून सकारात्मक निर्णय द्यावा, अशी मागणी यावेळी महासंघाने केली. यावर आठ दिवसात कंपनी अहवाल मागवून घेऊन योग्य कार्यवाही करू असे, आश्वासन कामगार मंत्र्यांनी दिले.