Wed, Apr 24, 2019 11:30होमपेज › Pune › मराठीच्या 'अभिजात' दर्जासाठी मसाप जाणार न्यायालयात

मराठीच्या 'अभिजात' दर्जासाठी मसाप जाणार न्यायालयात

Published On: Aug 29 2018 6:20PM | Last Updated: Aug 29 2018 6:20PMपुणे : प्रतिनिधी

नोव्हेंबर अखेरपर्यंत मुख्यमंत्र्यांनीमराठी  भाषेच्या  'अभिजात' साठी साहित्यिकांच्या शिष्टमंडळासह पंतप्रधानांची भेट घेतली नाही तर समविचारी संस्था आणि व्यक्तींच्या सहयोगाने 'अभिजात' दर्जासाठी न्यायालयात जाण्याचा निर्णय महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत आणि वार्षिक सर्वसाधारण सभेत घेण्यात आल्याची माहिती मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली. 

जोशी यांनी सांगितले, की सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता होऊनही अद्याप केंद्र शासनाने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला नाही. याबाबत पाठपुरावा करण्यासाठी गेल्या अडीच वर्षांपासून मसापने लोकचळवळ उभी केली. पंतप्रधानांना एक लाखांहून अधिक पत्रं पाठवली, राजकीय इच्छाशक्तीला आवाहन करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटी घेतल्या. मुख्यमंत्र्यांनी आग्रही भूमिका घ्यावी यासाठी त्यांची भेट घेऊन निवेदन दिले. मसापने शाहूपुरी शाखेमार्फत केंद्रीय मंत्री मंडळात अभिजात संदर्भात कोणती कार्यवाही झाली, याची माहितीच्या अधिकारात माहिती मागवली. गोपनीयतेचा मुद्दा पुढे करून ती देण्यात आली नाही. बडोद्याच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साहित्यिकांचे शिष्टमंडळ घेऊन पंतप्रधानांची भेट घेण्याचे आश्वासन दिले. सहा महिने उलटून गेले पण काहीच निर्णय झाला नाही.  

दरम्यान आज बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये साहित्य परिषदेच्या वतीने पुण्यात आणि मसापचे कार्यक्षेत्र असलेल्या चौदा जिल्ह्यात पुल आणि गदिमांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. ग्लोबल पुलोत्सवामध्ये मसाप सहभागी होणार आहे.