Tue, Apr 23, 2019 14:07होमपेज › Pune › खाजगी पशुवैद्यकीय पदविकाधारकांची नोंदणी न केल्यास काम बंद

खाजगी पशुवैद्यकीय पदविकाधारकांची नोंदणी न केल्यास काम बंद

Published On: Sep 03 2018 9:53PM | Last Updated: Sep 03 2018 9:53PMपुणे : प्रतिनिधी

पशुसंवर्धन विभागात शासनाकडे स्वतःचे पदविकाधारक चार हजार आणि पदवीधारक तीन हजार मिळून सात हजार पशुवैद्यकीय अधिकारी काम करतात. तर खाजगी क्षेत्रात 40 हजार पदविकाधारक वैद्यकीय अधिकारी काम करीत असून त्यांना शासकीय पदवीधरांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची अट रद्द करावी आणि शासनाकडे नोंदणी पूर्ववत सुरु न केल्यास काम बंद आंदोलनाचा इशारा पशुवैद्यकीय पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवस्थापन सेवा संघाने सोमवारी दिला आहे.

नवी पेठेतील निवारा आश्रम येथे संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा डॉ. सुकुमार कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी राज्यभरातील पशुवैद्यकीय पदविकाधारकांच्या उपस्थित हा निर्णय घेण्यात आला.  यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दौंडचे आमदार अ‍ॅड राहुल कुल, माजी सनदी अधिकारी शाम देशपांडे, ज्येष्ठ पत्रकार राजीव साबडे, शरद जोशी शेतकरी संघटनेचे नेते संजय कोले आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी आमदार कुल यांच्या हस्ते पशुरुग्ण औषधोपचार कृत्रिम रेतन पत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले.

आ. कुल म्हणाले की, संघटनेच्या मागण्यांबाबत मंत्रालय स्तरावर चर्चा केली असून त्याबाबतच्या बदलाचा प्रस्ताव पशुसंवर्धन विभागाकडून तयार होण्यासाठी प्रयत्न करीत आहे. ग्रामीण भागात सर्वत्र पदवीधर नसल्याने शेतकर्‍यांच्या पशुधनाच्या आरोग्यासाठी पदविकाधारक वैद्यकीय अधिकार्‍यांवरच अवलंबून राहावे लागते. त्यामुळे शेतकर्‍यांच्या सोयीसाठी व योग्य निर्णयासाठी प्रयत्न करीत आहे. केंद्र व राज्यांकडून दूध, साखर, कर्जमाफीसारखे प्रश्‍न सोडविण्यात आलेले आहेत.  

यावेळी शेतकरी संघटनेचे संजय कोले म्हणाले की, शेतकर्‍यांचे पशुधन हे महत्त्वाचे असून जनावरांच्या आजारावेळी खाजगी पदविकाधारक पशुवैद्यकीय अधिकारी तातडीने धावून येत शेतकर्‍यांना मदत करतात. मात्र, पदवीधारक जर या कामाच्या आड येणार असतील तर आम्ही खपवून घेणार नाही. तर रस्त्यावर उतरुन संघटनेने लढा उभारल्यास तो आमचाच प्रश्‍न समजून शेतकरीही सहभागी होतील,अशी ग्वाही दिली. 

सभेनंतर संघटनेचे कार्याध्यक्ष डॉ. सागर आरुटे आणि सचिव डॉ. नारायण जोशी म्हणाले की, संघटनेच्या मागण्या मान्य न झाल्यास 21 ऑक्टोंबर ते 22 नोव्हेंबर या कालावधीत काम बंद आंदोलन करण्यात येईल. तसेच पशुसंवर्धन आयुक्तालयावर सिरिंज फेको आंदोलन करण्यात येणार आहे.

आमचीही छळवणूक व एकच हशा...

संघटनेचे सचिव डॉ. नारायण जोशी हे वयोवृध्द असूनही संघटनेच्या मागण्यांसाठी पाठपुरावा करीत असल्याचा उल्लेख करुन आमदार राहुल कुल म्हणाले की, काही शासकीय अधिकारी हे छळवणूक करण्याचा आमचा अधिकार आहे, अशा पध्दतीने काम करतात. त्यांचा कायदेशीर अधिकार समजून आमचीही छळवणूक करतात. आमची छळवणूक होते, तेथे तुमचा तर लांबचा विषय असल्याचे म्हटल्यावर सभेत एकच हशा पिकला.