Thu, Jul 18, 2019 10:10होमपेज › Pune › शिरूरमध्ये खा. आढळरावांच्या विरोधात कोण?

शिरूरमध्ये खा. आढळरावांच्या विरोधात कोण?

Published On: Apr 19 2018 1:36AM | Last Updated: Apr 19 2018 1:08AMनंदकुमार सातुर्डेकर 

पिंपरी ः शिवसेना-भाजप युती झाली तरी आमदार महेश लांडगे यांच्यासाठी भाजपकडून शिरूरचा हट्ट धरला जाण्याचे संकेत व राष्ट्रवादीमध्ये हल्लाबोलमुळे निर्माण झालेला काहीसा उत्साह यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. सेनेचे खा. शिवाजीराव आढळराव पाटील यांचे मतदारसंघात काम चांगले असले तरी बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे त्यांचा वैयक्तिक करिष्मा या वेळी कितपत कामी येतो, हे निवडणुकीतच कळणार आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघात आजवर सेनेचा एकच आमदार निवडून येत आहे.  सन 2004 मध्ये बाळासाहेब दांगट (जुन्नर), सन 2009 मध्ये महादेव बाबर (हडपसर) तर 2014 च्या निवडणुकीत सुरेश गोरे (खेड) हे निवडून आले.  मात्र लोकसभा निवडणुकीत सेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील  निवडून येत आहेत 

सन 2009 च्या लोकसभा निवडणुकीत सेनेचे आढळराव पाटील 4 लाख 82 हजार 563 मते मिळवून विजयी झाले. राष्ट्रवादीचे विलास लांडे यांना 3 लाख 3 हजार 952 मते मिळाली. सन 2014 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने देवदत्त निकम यांना उमेदवारी दिली होती.  या निवडणुकीत आढळराव पाटील यांनी 6 लाख 43 हजार 415 मते घेऊन विजय मिळवला निकम यांना 3 लाख 41 हजार 601 मते मिळाली. 

शिरूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे तीन तर सेना, राष्ट्रवादी, मनसेचा प्रत्येकी एक आमदार आहे. भोसरीतून महेश लांडगे, हडपसरमधून योगेश टिळेकर, शिरूरमधून बाबूराव पाचर्णे हे भाजपचे तीन तर खेडमधून सेनेचे सुरेश गोरे, आंबेगावमधून राष्ट्रवादीचे दिलीप वळसे पाटील, जुन्नरमधून मनसेचे शरद सोनवणे हे निवडून आले आहेत.

विधानसभेला भाजपची ताकद वाढल्याने आ. महेश लांडगे लोकसभेची तयारी करीत आहेत बैलगाडा शर्यत, नाशिक फाटा ते राजगुरुनगर रस्त्याचे चौपदरीकरण, मोशीतील कचरा डेपोत वेस्ट टू एनर्जी प्रकल्प अशा विविध विषयांवरून खा. आढळराव पाटील व आ. लांडगे यांच्यात जुंपण्याचे कारण लोकसभा हेच आहे, त्यामुळे युती झाली तरी भाजप-सेनेत जागा वाटपावरून धुसफूस अटळ आहे.

राष्ट्रवादीत हल्लाबोलमुळे काहीसा उत्साह आहे. विलास लांडे, प्रदीप कंद, अशोक पवार, दिलीप मोहिते पाटील, पोपटराव गावडे, मंगलदास बांदल, देवदत्त निकम, वल्लभ बेनके यांची नावे चर्चेत आहेत. या मतदारसंघात  खासदार आढळराव यांचे काम चांगले आहे. मात्र, बदललेल्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर वैयक्तिक करिष्मा त्यांना कितपत उपयोगी पडतो हे येत्या निवडणुकीतच कळणार आहे.