Thu, Jun 27, 2019 17:51होमपेज › Pune › शेतकर्‍यांच्या बिलातून आडत कपात केल्यास कारवाई : सुभाष देशमुख

शेतकर्‍यांच्या बिलातून आडत कपात केल्यास कारवाई : सुभाष देशमुख

Published On: Jul 08 2018 10:15PM | Last Updated: Jul 08 2018 10:15PMपुणे : प्रतिनिधी

राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आजही काही ठिकाणी शेतकर्‍यांच्या अज्ञानाचा फायदा उठवून व्यापार्‍यांकडून शेतमालाच्या बिलामध्ये आडत कापली जाते. वास्तविक आडत ही शेतकर्‍यांऐवजी खरेदीदाराकडून वसुल करण्याचा कायदा आपण केला आहे. म्हणून अटल महापणन विकास अभियानाच्या चित्रफितीच्या माध्यमातून शासनाच्या योजना शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवायला हव्यात. त्यामुळे शेतकर्‍यांच्या बिलातून आडत कापल्याची तक्रार बाजार समितीमध्ये केल्यास संबंधितावर कारवाई करुन आळा घालण्यात येईल, असा इशारा सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी दिला.

कृषी पणन मंडळाच्या विविध योजनांच्या चित्ररथाचे उद्घाटन मार्केट यार्डात रविवारी सायंकाळी वारकर्‍यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आले. त्यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गाडीला हिरवा झेंडा दाखविण्यात आला.  ज्ञानेश्‍वर महाराजांच्या आळंदी ते पंढरपूर या वारी मार्गावर, पालखी मुक्कामी चित्ररथाद्वारे योजनांचे प्रसारण शेतकर्‍यांपर्यंत पोहविण्यात येणार आहे. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर पिंपळगांव बाजार समितीचे माजी सभापती  दिलीप बनकर, पणन संचालक डॉ. आनंद जोगदंड, मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार, सरव्यवस्थापक दीपक शिंदे, सहकार महामंडळाचे मिलिंद आकरे, जिल्हा उपनिबंधक आनंद कटके, बी.टी. लावंड, प्रकाश अष्टेकर, पुणे बाजार समितीचे प्रशासक बी.जे. देशमुख व अन्य अधिकारी, शेतकरी, वारकरी उपस्थित होते.

राज्यात संत शिरोमणी सावतामाळी आठवडे बाजार 137  ठिकाणी सुरु असून शेतकरी स्वतः माल विक्री करतात. त्यातून ग्राहकांना माफक दरात शेतमाल मिळत असल्याचे नमुद करुन ते  म्हणाले की, प्रत्येक गावातील विविध कार्यकारी संस्था या ग्रामीण भागाच्या विकासाचा कणा आहेत. एक गांव, एक खेडं आणि एक संस्था ही आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हायला हवी. उत्पादनाच्या मार्केटिंगमुळे ती विकास सोसायटी नावारुपाला आली पाहिजे. वारकर्‍यांंच्या दिंडीप्रमाणेच सहकाराची दिंडीची चळवळ देशभर पोहोचयला हवी. महात्मा गांधीचे स्वप्न होतं की खेड्यांकडे चला. त्या निमित्ताने पाच हजार विकास सोसायट्यांच्या बळकटीकरणासाठी चला खेड्यांकडे असे आपण अभियान राबवू. राज्यात 4 लाख बचत गट, 21 हजार विकास सोसायट्या आहेत, 350 ते 400 खरेदी विक्री संघ आहेत. या संस्था बळकट करण्यासाठी शासन कटिबध्द आहे.  

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील 60 कृषि उत्पन्न बाजार समित्यांचा समावेश ई-नाममध्ये केला आहे.  त्यामुळे शेतकर्‍यांचा शेतमाल ऑनलाईन खरेदी होणार असून शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर थेट पैसे जमा होणार आहेत. शेतकर्‍यांना याची माहिती घरी बसून मिळणार आहे. त्यामुळे फसवणूक टळणार असल्याचेही ते म्हणाले.

मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी योजनेमागील भुमिका, दीपक शिंदे यांनी स्वागत तर राजाराम दिघे यांनी प्रास्तविक केले.