Tue, Jul 16, 2019 01:44होमपेज › Pune › नेतृत्व करण्याऐवजी तुमच्यासोबत : उदयनराजेंची भूमिका

नेतृत्व करण्याऐवजी तुमच्यासोबत : उदयनराजेंची भूमिका

Published On: Aug 06 2018 1:54AM | Last Updated: Aug 06 2018 1:54AMपुणे ः प्रतिनिधी

मराठा आरक्षणाबरोबरच इतर मागण्यांसाठी राज्यभर सुरू असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनाचे नेतृत्व करण्याऐवजी त्यांच्या सोबतच राहणार आहे. प्रत्येक जिल्हा, तालुका पातळीवरील समन्वयकांनीच तेथील परिस्थितीनुसार आंदोलन करावे, अशी भूमिका खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केली.

मराठा आरक्षण परिषदेच्या निमित्ताने पुण्यामध्ये राज्यातील सर्व समन्वयकांची बैठक आयोजित  केली होती. या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. उदयनराजे  म्हणाले की, या बैठकीमध्ये आंदोलनाचे नेतृत्व करावे, अशी सर्वांनी भूमिका मांडली होती. परंतु, नेतृत्व करण्यापेक्षा तुमच्या सोबतच मीही आंदोलनामध्ये असेल. सरकारनेही मराठा समाजाचा अंत न पाहता आणि कोणतेही कारण न देताना त्वरित निर्णय जाहीर करावा, अशी मागणीही केली.

मराठा समाजाच्या मागण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना एक निवेदन पाठविण्यात येणार आहे. या निवेदनानंतरही शासनाने कोणताच निर्णय जाहीर केला नाही तर घडणार्‍या सर्व गोष्टींना सरकार, प्रशासन आणि न्यायव्यवस्था कारणीभूत असेल. आजही आरक्षणाबाबत न्यायव्यवस्था, प्रशासन आणि राज्यकर्त्यांनी ठरविले तर कोणतीही कारणे न देता मराठा आरक्षण दिले जाऊ शकते. परंतु, आयोग आणि न्यायालयाची कारणे देत वेळकाढूपणा चालला असल्याचा आरोपही खासदार उदयनराजे यांनी केला. मराठा समाजाला आरक्षण देताना किती टक्के द्यायचे यावर विचार सुरू आहे. वास्तविक पाहता सरकारने त्या-त्या समाजाच्या लोकसंख्येच्या आधारावरच आरक्षण दिले गेले पाहिजे.

धनगर आणि मुस्लिम समाजही आरक्षण मागत आहे. सरकारला आरक्षण देता येत नसेल तर तशी स्पष्ट भूमिका जाहीर करावी. कागदी घोडे नाचवून आयोगाच्या नावाखाली पळवाट काढू नये. सरकार समोरच आरक्षणावरील उपाय आहे; परंतु, आरक्षण देण्याची मानसिकता सरकारमध्ये असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे आगामी काळात आता कोणतीही चर्चा करण्यात येणार नाही, कसलीही निवेदने दिली जाणार नाहीत. फक्‍त आरक्षण दिल्याचा निर्णय शासनाने जाहीर करावा, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला. मराठा आरक्षणासाठी प्रत्येक जिल्ह्यातील आंदोलन समन्वयकांनी दि. 9 ऑगस्ट रोजी संपूर्ण बंद पाळण्याचे नियोजन केले आहे. प्रत्येक जिल्हा आणि तालुका पातळीवर त्या-त्या समन्वयकांनी निर्णय घेऊन आपापल्या पद्धतीने आंदोलन करावे. 

..तर लोकसभा निवडणुकीत जागा दाखवू

पुढील वर्षी लोकसभा निवडणूक होणार आहे. आत्तापर्यंत मराठा समाजाचा फक्‍त वापर करून घेतला. परंतु, सरकारने त्वरित आरक्षण जाहीर केले नाही तर आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा समाज तुम्हाला तुमची जागा दाखवेल, असा इशाराही त्यांनी  दिला. 

तरुण नक्षलवादाकडे वळतील

मराठा आरक्षणाबाबत तरुणांच्या भावना तीव्र आहेत. तरुणांनी आत्महत्यासारखे कृत्य करू नये. जीव देणारे जीव घेऊही शकतात. त्यामुळे सरकारने  याची गंभीर दखल घेऊन  वेळीच भूमिका जाहीर केली नाही तर तरुण नक्षलवादाकडे वळतील, अशी भीतीदेखील उदयनराजे यांनी व्यक्त केली. 

... अन्यथा सरकारला देवच वाचवेल

मराठा आरक्षणाबाबत गेल्या तीस वर्षांपासून लढा सुरू आहे. आयोग-समितीच्या नावाखाली वेळकाढूपणा चालू असून मुख्यमंत्र्यांना एक निवेदन पाठविण्यात येणार आहे. या निवेदनाचा विचार केला गेला नाही तर कदाचित पुढे होणार्‍या परिणामांपासून सरकारला देवच वाचवू शकेल, असा इशाराही उदयनराजे यांनी या वेळी दिला.