होमपेज › Pune › चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा खून

चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा खून

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनिधी

‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणार्‍या पतीने चारित्र्याच्या संशयावरून पत्नीच्या  डोक्यात फावडा घालून निर्घृण खून केला. हा प्रकार शुक्रवारी (दि. 30) रात्री साडेआठच्या सुमारास मोशीतील, नागेश्‍वर कॉलनी येथे घडला असून, बांधकाम व्यावसायिक पती पसार झाला आहे. 

शारदाबाई महेशभाई पटेल (50, रा. नागेश्‍वर कॉलनी, मोशी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे, तर बांधकाम व्यावसायिक असलेला पती महेशभाई रामजी पटेल (55) याच्याविरोधात भोसरी, एमआयडीसी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पटेल कुटुंबीय मूळचे भोपाळचे रहिवासी आहेत. महेश हा बांधकाम व्यावसायिक आहे तर, त्याची पत्नी शारदाबाई ही गृहिणी होती. शारदाबाई या गेल्या 15 वर्षांपासून महेश याच्यासोबत मोशी परिसरात राहत होत्या. त्यांचे हे दुसरे लग्न होते. त्यांच्या पहिला पतीचा दोन वर्षांपूर्वी मृत्यू झाला आहे.

महेश हा शारदाबाईंच्या चारित्र्यावर वारंवार संशय घेत होता. त्यामुळे त्यांच्यात नेहमी भांडणे होत होती. शुक्रवारी रात्री पती महेश मद्यप्राशन करून घरी आला. त्यानंतर त्या पती-पत्नींमध्ये भांडणे सुरू झाली. महेशने शारदाबाईंच्या डोक्यात फावडा घालून निर्घृण खून केला आणि पसार झाला. सकाळी पटेल कुटुंबीयांच्या घराचा दरवाजा उशिरापर्यंत बंद होता. त्यामुळे शेजार्‍यांनी त्यांच्या घराचा दरवाजा उघडला असता शारदाबाई मृत अवस्थेत आढळून आल्या. त्यांच्या डोक्यावर फावड्याचे घाव दिसून आले आहेत.

महेश आणि शारदाबाई पटेल या दोघांनी लग्न केल्याची कागदपत्रे मिळून आली नाहीत. त्यामुळे ते दोघे ‘लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये’ राहत असल्याची माहिती समोर येत आहे. महेशच्या मागावर पोलिस रवाना झाले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास भोसरी, एमआयडीसी पोलिस करीत आहेत.

 

Tags: Pimpri, Pimpri news, crime, immoral case, wife murder,


  •