Thu, Apr 25, 2019 15:49होमपेज › Pune › साखर मूल्यांकनात शंभर रुपये वाढ

साखर मूल्यांकनात शंभर रुपये वाढ

Published On: Aug 14 2018 1:35AM | Last Updated: Aug 14 2018 1:22AMपुणे : प्रतिनिधी

राज्य सहकारी बँकेकडून साखर मूल्यांकनात शंभर रुपयांनी वाढ करण्यात आली असून, क्‍विंटलला 2900 वरून हा दर 3000 रुपये करण्यात आला आहे. बँकेचा कर्ज पुरवठा असलेल्या साखर कारखान्यांना सुमारे 150 कोटींचा जादा निधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या उसाच्या एफआरपीची रक्‍कम देण्याबरोबरच, कारखान्यांना आपली कर्जखाती सुस्थितीत ठेवण्यासही फायदा होणार असल्याचे बँकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

मूल्यांकनातील वाढीमुळे ऑक्टोबर महिन्यापासून सुरू होणार्‍या गाळप हंगामापूर्व खर्चासाठी अल्पमुदत कर्ज मिळण्यासाठीही अडचण येणार नाही. राज्यात सध्या बंद असलेले साखर कारखाने सुरू करण्यासाठी उपलब्ध असलेल्या अनेक पर्यायांचा राज्य बँक सकारात्मक विचार करीत आहे. त्यात बंद असलेले साखर कारखाने भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्याच्या महत्त्वपूर्ण निर्णयाचा समावेश आहे. थकीत, आजारी कारखान्यांसाठी कर्जाचे पुनर्गठन, तसेच जादा निधी उपलब्ध करून देण्याबाबतही नाबार्ड आणि राज्य सरकारच्या मदतीने स्वतंत्र योजना आणण्याचा राज्य बँकेचा प्रयत्न आहे.

राज्यातील साखर कारखान्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी राज्य बँकेच्या वतीने सर्व कारखान्यांच्या कार्यकारी संचालकांबरोबर नुकतीच चर्चा केली. या चर्चेमध्ये कारखान्यांनी सुचविल्यानुसार कारखान्यांना अडचणीच्या ठरणार्‍या अनेक पद्धतीमध्ये धोरणात्मक बदल करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य बँकेने घेतला आहे. भागभांडवलाची कमाल मर्यादा निश्‍चित करणे, अर्जाची ऑनलाईन प्रक्रिया राबविणे, प्रोसेसिंग फी कमी करणे, कायदेशीर खर्च कमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे, दरवर्षी मंजुरीऐवजी खेळत्या भांडवलाची मुदत वाढविणे, अनावश्यक प्रशासकीय प्रक्रिया कमी करणे, इत्यादी निर्णयांचा त्यात समावेश असेल.

या पार्श्‍वभूमीवर राज्यातील साखर उद्योगास सर्वतोपरी मदत करण्याचे धोरण राज्य बँकेने स्वीकारल्याची माहिती बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी दिली. कारखान्यांच्या तारणात ठेवलेल्या साखरेवर प्रतिक्‍विंटलला 2900 रुपयांप्रमाणे असणारी कपात बँकेने यापूर्वीच केलेली आहे. त्यामुळे वाढलेल्या मूल्यांकनाच्या शंभर रुपयांतील नव्वद टक्क्यांपर्यंतची रक्‍कम कारखान्यांना बँकांकडून दिली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.