Sat, Nov 17, 2018 07:56



होमपेज › Pune › पिंपरी चिंचवड कडकडीत बंद

पिंपरी चिंचवड कडकडीत बंद

Published On: Aug 09 2018 4:53PM | Last Updated: Aug 09 2018 4:53PM



पिंपरी : प्रतिनिधी 

मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने राज्यभरात बंद पाळण्यात येत असून, या बंदला पिंपरी चिंचवडमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. तुरळक मार्गावर पीएमपीएमएलच्या बस धावत होत्या. रस्त्यावर शुकशुकाट दिसून येत होता. पिंपरी गाव, कॅम्प, संत तुकाराम नगर, भोसरी, इंद्रायणीनगर, चिंचवड गाव, वाल्हेकरवाडी, चिखली, जाधववाडी, निगडी प्राधिकरण, मोहननगर, आकुर्डी, पिंपळे सौदागर, सांगवी, रहाटणी आदी शहराच्या विविध भागातील दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवली आहेत. 

पिंपरी-चिंचवड शहरात सर्व नदी घाटांवर अग्निशमन दल आणि शासकीय कार्यालयांमध्ये बचाव पथके तैनात करण्यात आली होती. चाकण आंदोलनाची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आंदोलनात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

आंदोलनात समाजकंटक घुसून आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करतात. अशा लोकांवर पोलिस पाळत ठेऊन होते. त्याचबरोबर मराठा क्रांती मोर्चाच्या सर्व आंदोलकांनी देखील यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले होते. प्रत्येक चौकांमध्ये पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. शहरातील बहुतांश भागातील पीएमपीएमएल सेवा बंद ठेवण्यात आली होती.
 एरवी पुणे मुंबई महामार्ग तसेच  हिंजवडीच्या रस्त्यावर वाहन चालविणे म्हणजे कसरत असते. मात्र, आज या रस्त्यावर शुकशुकाट दिसून येत आहे. या परिसरातही सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. पिंपरी चौकात ठिय्या आंदोलन करण्यात आले. ठिकठिकाणाहून  कार्यकर्ते पिंपरी चौकात आले होते, तेथे सभा घेण्यात आली. 

राष्ट्रवादीचा पाठिंबा 
 या आंदोलनाला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने पाठिंबा व्यक्त करण्यात आला. शहराध्यक्ष संजोग वाघेरे म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून ज्या तरूणांनी बलिदान दिले, त्या तरूणांचे बलिदान व्यर्थ जाऊ नये. सरकारला आरक्षण देण्यासाठी येवढा वेळ का लागतोय हे समजण्या पलिकडे आहे.

कॉंग्रेसचा पाठिंबा
कॉंग्रेसनेही या आंदोलनास पाठिंबा दिला. शहराध्यक्ष सचिन साठे म्हणाले की, फडणवीस सरकार महाराष्ट्रातील बहुजन समाजाची आरक्षणाच्या मुद्यावर दिशाभूल करीत आहे. भाजपला सत्ता दिल्यास शंभर दिवसात मराठा, धनगर आणि मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन भाजपने दिले होते. जनतेने फसव्या आश्वासनांवर विश्वास ठेवून त्यांना सत्ता दिली.  चार वर्षे उलटून गेली तरी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर देवेंद्र फडणवीस यांचे सरकार वेळकाढूपणा करीत आहे. आघाडी सरकारने २०१३ लाच मराठा समाजाला आरक्षण दिले होते. आता फडणवीस सरकार मात्र, न्यायालयाचा मुद्दा पुढे करुन मराठा आरक्षणाबाबत महाराष्ट्रातील तमाम जनतेची दिशाभूल करीत आहे. पिंपरी चिंचवड मधील खासदार, आमदार देखील याविषयावर मुग गिळून गप्प बसले आहे. अशी टिका त्यांनी केली. 

मुस्लिम आरक्षण कृतीचा पाठिंबा 
मुस्लिम आरक्षण कृती समितीने मराठा समाजास आरक्षण देण्यास पाठिंबा जाहीर केला आहे. यासंदर्भात समितीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य निर्मिती केली. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या  पाठिशी मुस्लिम समाज खंबीपणे उभा होता. तशीच इतिहासाची परंपरा कायम ठेवत असताना आज पुन्हा मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी पिंपरी चिंचवड मुस्लिम आरक्षण कृती समिती पाठिंबा देत आहे.