Tue, Jul 07, 2020 19:56होमपेज › Pune › ‘घरकुल’साठी नव्याने नंबर लागलेले हवालदिल

‘घरकुल’साठी नव्याने नंबर लागलेले हवालदिल

Published On: Aug 05 2018 1:31AM | Last Updated: Aug 05 2018 12:37AMपिंपरी ः संजय शिंदे

पंडित जवाहरलाल नेहरू पुनरुत्थान योजनेअंतर्गत (जेएनएनयुआरएम) चिखली येथे महापालिकेच्या वतीने घरकुल योजना उभी करण्यात आली आहे; परंतु प्रशासनाच्या दिरंगाईच्या धोरणामुळे अनेकांना नऊ वर्षांनी ‘लकी ड्रॉ’मध्ये घरे मंजूर झाली आहेत. ‘ड्रॉ’च्यावेळी भरलेले पैसे सोडून ‘स्वहिस्सा’पोटीच्या रकमेसाठी महापालिकेने नेमून दिलेल्या बँकेत सध्या कर्ज उपलब्ध होत नाही. संबंधित बँकांनी कर्ज देण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला आहे. त्यामुळे घराचे स्वप्न साकार होण्याचा आनंद औट घटकेचाच ठरतो की काय, अशी परिस्थिती घरकुल मंजूर झालेल्यांच्या पुढे निर्माण झाली आहे. 

चिखली येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात  ‘जेएनएनयुआरएम’अंतर्गत आर्थिक दुर्बल घटकांसाठी डीपीआर मंजूर झाल्यानुसार 13 हजार 250 घरे दोन टप्प्यांत उभी करण्यात येणार होती. मात्र, पहिला टप्पा रद्द करण्यात आल्यामुळे ही संख्या अर्ध्याने घटून एकूण 6 हजार 636 घरांची निर्मिती करण्यात आली. पैकी 5 हजार 40 घरांचे वाटप आजपर्यंत झाले आहे. सध्या 876 घरांची प्रतीक्षा यादी लावण्यात आली आहे.

या घराची एकूण किंमत 7 लाख 17 हजार 700 रुपये आहे. त्यापैकी ‘ड्रॉ’च्या वेळी 50 हजार आणि ‘स्वहिस्सा’ म्हणून 3 लाख 26 हजार रुपये संबंधित व्यक्तीला 31 ऑगस्ट 2018 पर्यंत भरावयाचे आहेत. या प्रतीक्षा यादीत अनेकांना घरे मंजूर झाल्यामुळे संबंधितांच्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे; परंतु स्वहिश्शातील पैसे भरण्यासाठी ज्या बँकांकडे महापालिकेने कर्जासाठी अर्ज करण्यास सांगितले आहे. त्याठिकाणी घरकुलासाठी कर्ज देण्यास स्पष्ट शब्दात नकार दिल्यामुळे त्यांच्यामध्ये चिंतेचे वातावरण आहे. सत्ताधारी भाजपने यावर तोडगा काढावा, अशी मागणी संबंधितांकडून होत आहे.

31 ऑगस्टपर्यंत स्वहिस्सा रक्‍कम भरण्याची मुदत

चिखली येथील घरकुल योजनेतील एकूण 6 हजार 636 घरांपैकी 5 हजार 40 घरांचे वाटप करण्यात आले आहे. 876 घरांसाठी प्रतीक्षा यादी लावण्यात आली आहे. त्या अनुषंगाने ज्यांना घरे मिळाली आहेत, त्यांना 3 लाख 26 हजार रुपये भरावयासाठी महापालिकेच्या वतीने 31 जुलै पर्यंतची मुदत देण्यात आली होती. त्यानंतर वाढवून ती 31 ऑगस्टपर्यंत करण्यात आली आहे.

कर्जासाठी बँकांबरोबर समन्वय

जुन्या लोकांनी हप्ते वेळेवर न भरल्यामुळे नवीन लोकांना घरकुलासाठी कर्ज न देण्याचा निर्णय विविध बँकांनी घेतला आहे; मात्र आम्ही संबंधित बँक अधिकार्‍यांशी समन्वय साधत गेल्या महिन्यात त्याबाबत बैठका घेऊन त्यांच्या अडचणी समजून घेत जुन्याकडून कर्ज वसुली करण्यास मदत करून असे आश्वासन दिले आहे. त्या अनुषंगाने संबंधितांना नोटिसा ही दिल्या आहेत. आम्ही बँकांना विनंती केली आहे की, नव्याने घरकुल मंजूर झालेल्यांना बँकेच्या नियमानुसार कर्ज उपलब्ध करून द्यावे.  - चंद्रकांत इंदलकर, सहा. आयुक्‍त