Wed, Mar 27, 2019 00:06होमपेज › Pune › पंतप्रधान आवास योजना कोणाची घरे भरण्यासाठी नको! 

पंतप्रधान आवास योजना कोणाची घरे भरण्यासाठी नको! 

Published On: Aug 24 2018 12:47AM | Last Updated: Aug 23 2018 10:18PMपिंपरी : प्रतिनिधी 

केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजने अंतर्गत पिंपरी चिंचवड महापालिके-मार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनेत पारदर्शकता असावी. ही योजना कोणाची तरी घरे भरण्यासाठी न राबविता गोरगरिबांना घरे मिळावीत, अशी सर्वांची अपेक्षा असल्याचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या योजनेतील भ्रष्टाचाराबाबत पत्र देऊन त्यांचे लक्ष वेधले. त्यांनी योग्य ठिकाणी लाल पेनाने रिमार्क मारून कार्यवाहीचे आदेश दिल्याचे खा. आढळराव यांनी सांगितले. 

खा. आढळराव म्हणाले की, समाजाभिमुख योजनांना कोणाचा विरोध असण्याचे कारण नाही. मात्र, त्याचा हेतू चांगला असावा. पंतप्रधान आवास अंतर्गत बांधकामांच्या दरांबाबत अनेकांनी आवाज उठविल्यानंतर आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी एक आयटम कमी करून दर कमी केल्याचे दाखविले. हा पोरखेळ आहे. होलसेलमध्ये भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप खा. आढळराव यांनी केला. 

मेट्रोला वेळ लागत आहे का? असे विचारले असता ते म्हणाले की, लोकांच्या  जमिनींशी संबंध येतो. भूसंपादन, यंत्रणा यामुळे थोडा वेळ लागत आहे.  मात्र, काम योग्यरीत्या सुरू आहे. मेट्रो नाशिकफाटा, भोसरी, चाकणपर्यंत निश्‍चित जाईल त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होईल असे ते म्हणाले. पालिकेत भाजपची सत्ता आल्यापासून राष्ट्रवादीच्या काळापेक्षा कैकपटीने भष्टाचार सुरू आहे. आपल्या आधीच्या अनुभवाचा वापर करून त्यांनी स्कोअर केला आहे, अशी टीका खा. आढळराव यांनी केली. 

खालून पहिला क्रमांक यायला हवा होता

राहण्यायोग्य शहरांच्या यादीत पिंपरी-चिंचवडचा 69 वा क्रमांक असल्याबद्दल खा. आढळराव यांना विचारले असता. या शहरातील गुंडगिरी, नियोजनशून्य कारभार, भ्रष्टाचार पाहता खालून पहिला नंबर यायला हवा होता, असे ते म्हणाले.