Sun, Apr 21, 2019 06:36होमपेज › Pune › पुण्यात ऑनर किलींग; 'सैराट'ची पुनरावृत्ती

पुण्यात ऑनर किलींग; 'सैराट'ची पुनरावृत्ती

Published On: Aug 07 2018 3:11PM | Last Updated: Aug 07 2018 3:11PMपुणे : प्रतिनिधी 

मनाविरुद्ध लग्न केल्याच्या रागातून नाराज असलेल्या मुलीच्या  मामा आणि चुलत भावानेच तिच्या पतीचा खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. मागील वर्षी जून महिन्यात तरुणाचा खून करण्यात आला होता. पोलिसांच्या चौकशीअंती हा ऑनर किलिंगचा प्रकार असल्याचे समोर आल्यावर दोघांवर विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

इंद्रजित उमाशंकर गौड (२१, लोहगाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर पोलिस उपनिरीक्षक डी. जे. जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कमलेश मल्लू गौड व अमरनाथ दशरथ गौड (रा. मदनपुरा थाना हदलहाट, उत्तरप्रदेश) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंद्रजीत गौड हा मुळचा उत्तरप्रदेशचा राहणारा होता. त्याने प्यारी हिच्याशी प्रेमविवाह केला. तो पुण्यात प्यारी हिच्यासह काम करण्यास आला होता. दोघेही पुण्यातील लोहगाव परिसरात निंबाळकर चाळ येथे राहत होते. दोघांच्या विवाहाला कुटुंबीयांचा विरोध होता. त्यांच्याशी कुटुंबीयांनी संबंध तोडले होते. दरम्यान, घटनेच्या तीन महिन्यांपूर्वी प्यारीचा मामा कमलेश गौड आणि तिचा चुलत भाऊ अमरनाथ  गौड हे दोघे पुण्यात कामाच्या शोधात आले होते. त्यांनी इंद्रजितकडे काम शोधण्यासाठी मदत मागितली. ते दोघेही इंद्रजित आणि प्यारी यांच्यासोबत लोहगाव येथे राहत होते. त्यादरम्यान  २० जून रोजी इंद्रजितचा मृतदेह घरात आढळून आला. 

विमानतळ पोलिस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्याच्या मानेवर बोथट हत्याराने वार केल्याचे आणि गळा दाबल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांना संशय आल्याने त्यांनी तपासाची चक्रे फिरवली. शेजारी, नातेवाईक यांच्याकडे चौकशी केली. त्याच्या मृत्यूनंतर दोघेही पसार झाले होते. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत  कमलेश गौड आणि अमरनाथ गौड यांनी प्यारी हिच्यासोबत इंद्रजितने प्रेमविवाह केल्याच्या रागातून त्याचा खून केल्याचे निष्पन्न झाले. विमानतळ पोलिसांनी यासंदर्भात दोघांवरही गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक एस. बी. खेडकर करत आहेत.