Fri, Mar 22, 2019 01:27
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › ‘चित्रसेतू’तून जपला ग्रामसंस्कृतीचा वारसा

‘चित्रसेतू’तून जपला ग्रामसंस्कृतीचा वारसा

Published On: Aug 02 2018 2:00AM | Last Updated: Aug 01 2018 10:42PMपिंपरी : पूनम पाटील

शहरीकरणाच्या रेट्यात गावपण हरवत  आहे. याच भावनेतून अस्वस्थ होऊन पुणे-बेंगलोर महामार्गाजवळील नागेवाडी गावच्या उड्डाणपुलावर काही युवकांनी चित्रसेतू रेखाटला आहे. या चित्रसेतूतून या तरूणांनी ग्रामसंस्कृती जपण्याचा प्रयत्न केला आहे. हल्ली उड्डाणपुलावर नुसतीच जाहिरातींची गर्दी दिसून येते. मात्र, सातारा जिल्ह्यातील नागेवाडी येथील उड्डाणपूल या सर्वांना अपवाद ठरला आहे. या उड्डाणपूलावर सातार्‍यातील ग्रामसंस्कृती रेखाटण्यात आली आहे. 

विविध भागांतील साठ ते सत्तर युवकांनी एकत्र येऊन वीर गर्जना या बहुद्देशीय संस्थेची स्थापना केली आहे. ग्रामीण संस्कृती जपण्यापासून अंध-अपंगांना अर्थसाह्य करण्यापर्यंत तसेच, पर्यावरण संवर्धनासाठी ही संस्था काम करत आहे. नागेवाडी उड्डाणपूलावरील चित्रे साकारण्यासाठी जवळपास दिड ते दोन महिन्यांचा कालावधी लागला असून राज्यातील प्रत्येक स्थानिक प्रशासनाने विविध स्थानिक कलाकारांना या माध्यमातून एक व्यासपीठ द्यावे व ग्रामसंस्कृती जपण्याचा प्रयत्न करावा. यामुळे नवीन पिढीलाही ग्रामसंस्कृती जपण्याची प्रेरणा मिळेल, अशी आशा विकास सावंत यांनी व्यक्त केली.