Mon, Aug 19, 2019 09:43होमपेज › Pune › पुण्यात जोरदार सरी शहरात सायंकाळनंतर जोरदार 

पुण्यात जोरदार सरी शहरात सायंकाळनंतर जोरदार 

Published On: Jun 02 2018 2:03AM | Last Updated: Jun 02 2018 12:42AMपुणे : प्रतिनिधी

पुणे शहर व परिसरात शुक्रवारी सायंकाळनंतर पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. दुपारी 3 वाजेच्या सुमारास आकाशात काळेकुट्ट ढग दाटून आले. सायंकाळी चार वाजता उपनगरांच्या काही भागात वादळी वार्‍यासह व मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली. शिवाजीनगर परिसरात मुसळधार पाऊस पडला असून स्वारगेट, टिळक रस्ता, फर्ग्युसन कॉलेज रस्ता, विद्यापीठ, सिंहगड रस्ता आदी भागात रात्री उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती. सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत शहरात (शिवाजीनगर) 25.3 मि.मी. पावसाची नोंद झाली. अचानक आलेल्या पावसामुळे दुचाकीस्वारांची चांगलीच धांदल उडाली. दरम्यान, पिंपरीतही वादळी वार्‍यासह गारांचा पाऊस पडला. 

शहरात दुपारपर्यंत सूर्य अक्षरशः आग ओकत होता. आर्द्रतेच्या प्रमाणातदेखील प्रचंड वाढ झाल्याने पाऊ स हजेरी लावेल, असे सर्वांनाच वाटत होते. पुढील 2-3 दिवस शहराच्या काही भागात दुपारनंतर मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडेल, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. 

येरवडा, विश्रांतवाडीत तळी 
येरवडा : येरवडा, विश्रांतवाडी, लोहगाव परिसरात सायंकाळी सुमारे अर्धा तास पाऊस पडला. रस्त्यात पाणी साचल्यामुळे नगर रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. पावसामुळे रस्त्यावरील विक्रेते, दुचाकीचालक यांची चांगलीच धावपळ उडाली. 

वाहतूक मंदावली
कोथरूड : नळस्टॉप, कर्वेनगर, कोथरूड, चांदणी चौक, वारजे परिसरात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे वाहतूक मंदावली होती. मावळे आळी, राजाराम पूल परिसर, डावी भुसारी कॉलनी, कोथरूड बसस्थानकावर पाण्याची डबकी निर्माण झाली होती. राजाराम पूल ते म्हात्रे पुलावर नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले.

ढगांचा गडगडाट व विजांचा कडकडाट
पौड रोड : पौड रोड परिसरात ढगांचा गडगडाट व विजांच्या कडकडाटासह वरुणराजाने हजेरी लावली. शुक्रवारी दुपारी 3 च्या सुमारास पावसाने हजेरी लावली. पावसामुळे कोथरूड डेपो ते डेक्कन मार्गावर सिग्नल बंद पडले होते.

वाहनचालकांची कसरत
वाघोली : वाघोली येथे जोराच्या वार्‍यासह पावसाचे आगमन झाले. साधारण दहा मिनिटे पडलेल्या पावसामुळे नागरिकांना उकड्यापासून काही प्रमाणात सुटका मिळाली आहे. केसनंद फाटा, आव्हाळवाडी फाटा, वाघेश्‍वर चौक या ठिकाणी पाणी साचले आहे. केवळ दहा मिनिटांच्या पावसाने ही पारिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाळ्यामध्ये तर महामार्गाची अतिशय दुरवस्था होणार आहे. पावसाचे पाणी जाण्यासाठी नाल्या नसल्यामुळे दर वर्षी महामार्गाला पुराचे स्वरूप येते. यामुळे वाहनचालाकांना कसरत करावी लागते.