Mon, May 20, 2019 10:06होमपेज › Pune › शहरात पावसाची दमदार हजेरी

शहरात पावसाची दमदार हजेरी

Published On: Jun 02 2018 2:03AM | Last Updated: Jun 01 2018 11:42PMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी - चिंचवड शहरात शुक्रवारी (दि.1) पावसाने दमदार हजेरी लावली. वादळी वार्‍यासह शहरात अचानक पावसाने हजेरी लावल्याने   शहरवासीयांची एकच धांदल उडली. यावेळी तासभर जोरदार  झालेल्या पावसाने रस्त्याच्या दुतर्फा पाणी साचले होते. त्यामुळे पाण्यातून वाट काढताना वाहनचालकांना कसरत करावी लागली.   शहरातील विविध भागात पावसाने दुपारी पावणेचार वाजता दमदार हजेरी लावली. पिंपरी, चिंचवड, भोसरी तसेच उपनगरांसह शहरातील विविध भागात विजेच्या कडकडाटासह पावसाचे आगमन झाले. यामुळे अचानक आलेल्या पावसाने नागरीकांची धांदल उडाली.   शहरातील काही भागात गारांचा पाऊस झाला. पावसापासून बचाव करण्यासाठी वाहनधारकांनी झाडाखाली तसेच ग्रेडसेपरेटरमधील पादचारी पुलाखाली आश्रय घेतला. त्यामुळे ग्रेडसेपरेटर व मुख्य रस्त्यावर वाहने उभी केल्याने वाहतूक  खोळंबली होती.  

सायंकाळी पाच वाजेपर्यंत पाउस सुरु होता. गेले महिनाभर असह्य उकाडयाने हैराण झालेल्या नागरीकांना पावसाच्या आगमनाने दिलासा मिळाला.पाऊस आणि वादळी वार्‍यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली होती. शहरात पावसाने हजेरी लावली असली तरी धरण क्षेत्रात मात्र पावसाने ओढ दिली. सहा जून नंतर परीसरात पावसाचे आगमन होईल असा अंदाज यावेळी अधिकार्‍यांनी वर्तवला. तर जून महिन्याचा पहील्याच दिवशी पावसाने दमदार हजेरी लावल्याने पावसाच्या आगमनाने असह्य उकाड्यापासून सुटका झाल्याने शहरवासीय मात्र सुखावले. यावेळी बच्चेकंपनीसह नागरीकांनी पावसात भिजण्याचा आनंद लुटला.

वीजपुरवठा खंडित
विविध भागात वादळी वारा व गारांसह पाऊस झाला. त्यामुळे शहरातील सर्वच भागातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. सायंकाळी सहा वाजेपर्यंत सर्वच भागात बत्ती गुल होती. त्यामुळे बाहेर गारवा आणि घरात उकाडा अशा संमिश्र वातावरणाचा शहरवासीयांनी अनुभव घेतला. वादळी वारा व गारांच्या पावसामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला असून जवळपास सर्वच भागातील विद्युत पुरवठा खंडित झाल्याची माहिती महावितरणचे अभियंता शिवाजी वायफळकर यांनी दिली.