Mon, Aug 26, 2019 08:34होमपेज › Pune › उत्तरेकडील उष्ण वार्‍याने गरमी

उत्तरेकडील उष्ण वार्‍याने गरमी

Published On: Apr 26 2019 1:47AM | Last Updated: Apr 26 2019 1:47AM
पुणे : प्रतिनिधी 

पुणे शहर व परिसरातील तापमान वाढीमागे बरीच कारणे आहेत. गेल्या दोन दिवसांपासून शहरात 40 अंशांच्या पुढे नोंदविले जात असलेले तापमान उत्तर भारतातून शहरात येणारे अति कोरडे वारे, मध्य प्रदेश व गुजरात या उत्तर-पश्‍चिम दिशेकडून येणारे उष्ण वारे, बंगालच्या उपसागरात नव्याने निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील कमी झालेले बाष्पाचे प्रमाण आदी कारणांमुळे राज्यासह शहरात सध्या कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाल्याचे निरीक्षण हवामान तज्ज्ञांनी नोंदविले आहे.

 शहरातील पर्यावरणाचा झालेला  र्‍हास, जागतिक तापमान वाढीचा परिणाम तसेच बेसुमार सिमेंट बांधकामे आदी गोष्टींमुळेदेखील ऐन एप्रिलमध्येच पुण्यात उष्णतेचा कहर अनुभवण्यास मिळत असल्याचेही या तज्ज्ञांनी नमूद केले. दरम्यान, शहरात एप्रिल महिन्यातील गेल्या पाच वर्षांतील सर्वाधिक तापमानाची नोंद बुधवारी झाली. गेल्या पाच वर्षांत शहरातील कमाल तापमानाने 41 अंशांचा टप्पा केवळ एकदाच ओलांडला होता. 30 एप्रिल 2013 रोजी शहरात 41.3 अंशांची नोंद झाली होती. त्यानंतर बुधवारी (दि. 24) पारा 41.1 अंशांवर नोंदविला गेला. 30 एप्रिल 2009 रोजी 41.7 अंश सेल्सिअस व 17 एप्रिल 2010 रोजी 41.5 अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदविले गेले होते. पुढील 2-3 दिवस शहरातील कमाल तापमान 41 अंशांच्या घरात राहील, असा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे.

‘गुगल’चा अंदाज फेटाळला

गुगलच्या ‘वेदर डॉट कॉम’ने केलेल्या ‘प्रेडिक्शन’नुसार (अंदाज) पुणे शहरात शुक्रवारी (दि. 26) 42 अंश, शनिवारी (दि. 27) 43 अंश, रविवारी (दि. 28) 44 अंश सेल्सिअस कमाल तापमान राहू शकते. ‘आयएमडी’चे हवामान निरीक्षण व विश्‍लेषण गट प्रमुख ए. के. श्रीवास्तव यांनी शहरातील कमाल तापमान रविवारपर्यंत 44 अंशांपर्यंत जाईल, हा गुगलने वर्तविलेला अंदाज साफ फेटाळला. शहरातील उकाड्यात लक्षणीय वाढ झाली आहे. परंतु, संपूर्ण हंगामात 41.5 अंशांच्या पुढे कमाल तापमान नोंदविले जाणार नाही, असे शासकीय अनुमान त्यांनी वर्तविले. ‘गुगल’च्या सर्च बार मध्ये ‘पुणे तापमान’ शोधले असता ‘वेदर डॉट कॉम’चे हे परिणाम प्रामुख्याने दाखविले जातात.