Mon, Mar 18, 2019 19:20होमपेज › Pune › हायहिल्सची‘फॅशन’ डोक्याला ‘टेन्शन’

हायहिल्सची‘फॅशन’ डोक्याला ‘टेन्शन’

Published On: May 08 2018 1:54AM | Last Updated: May 08 2018 12:14AMपिंपरी : पूनम पाटील

पिंपरी-चिंचवड शहरात महिलांमध्ये हायहिल्स सॅण्डल्स वापरण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे मणका व गुडघ्यासह इतर आजारांचा महिलांना सामना करावा लागत आहे. पाय घसरुन पडण्याच्या घटनाही घडत आहेत. त्यामुळे काळजी घेण्याचे आवाहन शहरातील तज्ज्ञ करत आहेत.  हायहिल्सची ‘फॅशन’ डोक्याला ‘टेन्शन’ असेच म्हणण्याची वेळ सध्या महिलांवर आली आहे. 

फॅशन बेतली जीवावर..

सध्या लग्नसराईचे दिवस सुरू असून सर्वत्र लग्नांचा धडाका सुुरु आहे. लग्नांमध्ये खुलून दिसण्यासाठी महिला विविध प्रकारची फॅशन करत आहेत. ब्रॅण्डेड साड्यांपासून महागडी सॅण्डल्स वापरण्याकडे महिलांचा कल आहे; मात्र हायहिल्स सॅण्डल्सची ही फॅशन आता जीवावर बेतू लागली आहे. कल्याण येथे उंच टाचेच्या चपला घातलेल्या महिलेला पाय घसरल्याने तिच्या हातातील सहा महिन्यांच्या चिमुरड्याला जीव गमवावा लागल्याची घटऩा नुकतीच घडली; पिंपरी-चिंचवड शहरातही अनेक ठिकाणी या घटना घडु लागल्या आहेत. 

उंच टाचेच्या चपलांमुळे विविध प्रकारच्या मणक्याचे आजार होऊ शकतात. त्यामुळे महिलांनी उंच टाचेच्या चपला वापरु नये असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. उंच टाचांच्या चपलांचा वापर केल्याने पायाचे दुखणे व पाठदुखी दोन्ही वाढतात. त्यामुळे बोटे आणि पिंडर्‍या यांमध्ये त्रास जाणवतो; तसेच रक्‍तप्रवाहाच्या आणि गुडघेदुखी व पाठ यांच्या वेदनांच्या समस्याही वाढतात. हायहिल्स सतत वापरल्याने महिलांना बाळंतपणावेळीही याचा त्रास होऊ शकतो, अशी माहिती वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली आहे. 

फॅशन शो-मध्येही घसरण्याच्या घटना

केवळ लग्नसमारंभातच नव्हे तर मोठमोठ्या फॅशन शो दरम्यान शो-स्टॉपर व मॉडेल्स या हायहिल्स चपलांमुळे घसरुन पडल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे नामांकित फॅशन शो तर फ्लॉप झालेच आहेत; परंतु या मॉडेल्सना गंभीर दुखापत झाली आहे. कित्येक जणींना कायमस्वरुपी पायाचे दुखणे सुरु झाले आहे. त्यामुळे हायहिल्स वापरताना सावधान रहा, असा सल्‍ला शहरातील तज्ज्ञ देत आहेत.