Tue, Apr 23, 2019 09:35होमपेज › Pune › मला मते देऊ नका... सांगणाराच आला निवडून!

मला मते देऊ नका... सांगणाराच आला निवडून!

Published On: Jan 08 2018 10:37AM | Last Updated: Jan 08 2018 10:38AM

बुकमार्क करा
शिवनगर : प्रा. अनिल धुमाळ

प्रिय, मतदार बंधू आणि भगिनी यांना आवाहन करतो, की मी ग्रामपंचायत निवडणुकीचा अर्ज माघारी घेत असून आपण मला मतदान करू नये, तसे केल्यास ते मतदान ग्राह्य धरले जाणार नाही याची कृपया नोंद घ्या, असे जाहीर पत्रक काढून देखील मानाप्पावाडी (ता.बारामती) ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत धनसिंग लक्ष्मण जगताप हे निवडून आले असल्याने बारामती तालुक्यासह परिसरात चर्चा रंगत आहे. 

नुकत्याच जिल्ह्यातील दुसर्‍या टप्प्यातील ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुका झाल्या. यामध्ये बारामती तालुक्यातील मानाप्पावाडी ग्रामपंचायतीचा समावेश होता. येथील निवडणुकीत भैरवनाथ परिवर्तन पॅनेल व मानाप्पावाडी ग्रामविकास पॅनेलमध्ये सरळ लढत होती. मात्र भैरवनाथ परिवर्तन पॅनेलकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेले धनसिंग जगताप यांनी निवडणुकीच्या अगोदर चार दिवस एक पत्रक काढून, मी उमेदवारी अर्ज माघारी घेत असून तहसीलदारांकडे अर्ज केला असल्याचे सांगत मला कोणीही मतदान करू नये, तसे केल्यास आपले मत ग्राह्य धरले जाणार नसल्याचे सांगितले, तसेच सर्व मतदारांनी मानाप्पावाडी ग्रामविकास पॅनेलच्या सरपंचपदाच्या उमेदवारासह बाकीच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन केले.

दुसरीकडे भैरवनाथ परिवर्तन पॅनेलच्या प्रमुखांनी जरी आपला उमेदवार फुटून विरोधी पॅनेलच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन करत असला तरी या उमेदवाराने आपल्या पॅनेलकडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र काही अडचणीमुळे तो उमेदवार विरोधी गटाच्या पॅनेलला जाऊन मिळाला असला तरी त्या उमेदवाराला भैरवनाथ परिवर्तन पॅनेलमधूनच निवडून आणायचा असा चंग बांधला. त्याप्रमाणे पॅनेलच्या प्रमुखांनी आणि कार्यकर्त्यांनी बाजी मारत मला मतदान करू नका असे, आवाहन करणार्‍या धनसिंग जगताप यांना निवडून आणले आहे.

या निवडणुकीत सरपंचपदासह 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. यात सरपंचपदी भैरवनाथ परिवर्तन पॅनेलच्या योगिता विक्रम जगताप निवडून आल्या. मात्र पॅनेलचे धनसिंग लक्ष्मण जगताप यांच्यासह 11 पैकी 6 उमेदवार निवडून आले आहेत. मात्र धनसिंग जगताप यांनी भैवनाथ परिवर्तन पॅनेलला निवडणुकीच्या अगोदरच सोडचिठ्ठी देत मानाप्पावाडी ग्रामविकास पॅनेलला साथ दिली आहे. मात्र धनसिंग जगताप हे भैरवनाथ पॅनेलकडून निवडून आले आहेत. धनसिंग जगताप हे आमच्याच गटाचे सदस्य असल्याचा दावा दोन्ही पॅनेलप्रमुखांनी केला आहे. अशा वेळी उपसरपंचपद कोणत्या गटाकडे जाईल याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

धनसिंग लक्ष्मण जगताप यांनी आमच्या पॅनेलकडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तथापि त्यांनी कोणाच्यातरी दबावाला बळी पडत आमच्याविरोधी पॅनेलला साथ देण्याचा निर्णय घेतला. परंतु आमच्या पॅनेलच्या सर्व प्रमुखांनी आणि कार्यकर्त्यांनी त्यांना निवडून आणण्याचा चंग बांधला होता, त्याप्रमाणे ते निवडूनही आले. आता मात्र त्यांनी जनतेने मतदानाच्या माध्यमातून दिलेला कौल स्वीकारत कोणाला साथ द्यायची हे सदसद्विवेकबुध्दीला स्मरून ठरवावे.

- योगेशभैया जगताप, भैरवनाथ परिवर्तन पॅनेलप्रमुख माजी नगराध्यक्ष, बारामती नगरपालिका