Wed, Mar 27, 2019 06:30होमपेज › Pune › हॅरिस समांतर पुलाचे काम रखडले

हॅरिस समांतर पुलाचे काम रखडले

Published On: Apr 17 2018 1:52AM | Last Updated: Apr 17 2018 12:48AMमिलिंद कांबळे 

पिंपरी : दापोडीहून बोपोडीकडे जाणार्‍या हॅरीस पुलास समांतर पुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. मात्र, बोपोडीतील आदर्शनगर झोपडपट्टी न हटविल्याने बोपोडीहून दापोडीकडे जाणार्‍या पुलाचे काम रखडले आहे. तेथील बाधीत झोपडीधारकांना औंध येथे स्थलांतरास भाजपच्याच नगरसेविकेने विरोध करत न्यायालयात गेल्या आहेत. त्यामुळे पुलाचे काम रखडण्याची शक्यता आहे. परिणामी पुलाच्या विकासकामाला खो बसला आहे.  

बोपोडी सिग्नल चौकात वाहतूक ठप्प होऊन दोन ते तीन किलोमीटर अंतरापर्यंत वाहने अडकून पडत असल्याचे नित्याचे चित्र आहे. त्यावर उपाय म्हणून हॅरीस पुलास समांतर पुलाचे काम पिंपरी  व पुणे पालिकेने 14 मे 2016 ला सुरू केले. दापोडीहून बोपोडीकडे जाणारा पुल जूनच्या सुरूवातीला खुला केला जाणार आहे. 

मात्र, दुसर्‍या बाजूच्या बोपोडीतील आदर्शनगर झोपडपट्टी न हटविल्याने जागा ताब्यात न आल्याने त्या ठिकाणी अद्याप कामच सुरू झालेले नसल्याने काम रखडले आहे.  पुल व 42 मीटर रस्ता रूंदीकरणातील बाधीत 266 झोपडीधारकांना औंध, वारजे आणि हडपसर येथे स्थलांतर केले असून, त्यांना औंध क्षेत्रीय कार्यालयाद्वारे झालेल्या सोडतीद्वारे सदनिकेच्या चाव्या 22 मार्चला दिल्या आहेत.  मात्र, औंध येथे स्थलांतरास भाजप नगरसेविका अर्चना मुसळे यांनी विरोध केला आहे. 

भाजपने ‘सबका साथ सबका विकास’ म्हणत विकासाचा घोषणा निवडणुकीत दिल्या होत्या. मात्र, सध्या परिस्थिती वेगळी आहे. बोपोडीतील ‘विशिष्ट’ समाजाचे कुटुंबे औंध परिसरातील ‘स्मार्ट’ भागात नको, असल्याने त्याला विरोध होत असल्याचे धक्कादायक बाब समोर आली आहे. बोपोडी-औंध प्रभागातील भाजपचे तीन नगरसेवक स्थलांतराच्या बाजूने तर, नगरसेविका मुसळे या विरोधात आहेत.  त्याकरीता औंध भागात रस्ता रोको आंदोलन ही झाले. तसेच, नगरसेविकेसह नागरिक न्यायालयातही गेले आहेत. त्यामुळे पुलाचे काम आणखी रखडण्याची शक्यता आहे.