Mon, Aug 19, 2019 11:05होमपेज › Pune › कोकणातील हापूसचा गोडवा पाडव्यानंतर

कोकणातील हापूसचा गोडवा पाडव्यानंतर

Published On: Mar 07 2018 1:55AM | Last Updated: Mar 07 2018 12:17AMपुणे : प्रतिनिधी 

फळांचा राजा असलेल्या कोकणातील हापूस आंब्याची बाजारात तुरळक आवक होऊ लागली आहे. मंगळवारी गुलटेकडी मार्केटयार्डातील फळबाजारात 150 ते 160 पेटींची आवक झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत केवळ 25 टक्के माल बाजारात दाखल होत आहे. दहा दिवसांवर गुढीपाडव्याचा सण आलेला असतानाही आंब्याचे भाव सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने यंदा हापूसचा गोडवा पाडव्यानंतर चाखायला मिळणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.  

याबाबत बोलताना व्यापारी युवराज काची म्हणाले, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पूजेसह खाण्यासाठी आंब्याला मागणी होत असते. सध्या रत्नागिरीच्या पावस, खंडाळा येथून हापूसच्या 150 ते 160 पेट्या बाजारात दाखल होत आहेत. त्यास प्रतवारीनुसार घाऊक बाजारात हापूसच्या 4 ते 8 डझनाच्या पेटीला 4 हजार ते 6 हजार रुपये दर मिळत आहे. तर होलसेल बाजारात डझनाला 1 ते 2 हजार व किरकोळ बाजारात 1 हजार 500 ते 3 हजार रुपये दर मिळत आहे. सध्या हापूसच्या चांगल्या प्रत व आकाराची प्रतीक्षा आहे. गेल्या वर्षी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर कोकणातून 1 हजार हापूसच्या पेट्या तसेच कर्नाटकातूनही आंब्याची आवक झाली होती. मात्र, यंदा कर्नाटकातील हापूसची आवक अद्याप सुरू झालेली नाही.

तर, रत्नागिरीहूनही अत्यल्प आवक होत आहे. आंब्याच्या चढ्या दरांमुळे सर्वसामान्यांची हंगामाच्या सुरुवातीच्या काळात आंबा खाण्याची मानसिकताही नसल्याचे सांगितले.  गुढीपाडव्याच्या पार्श्‍वभूमीवर येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये कोकणातून हापूसच्या आवकेत दुपटीने वाढ होईल, अशी शक्यता व्यक्त करताना व्यापारी अरविंद मोरे म्हणाले, गेल्या वर्षी होळीनंतर हापूसची नियमित आवक सुरू झाली होती. या वेळी बाजारात जवळपास 1 हजार पेट्या दाखल होत होत्या.

मात्र, यंदा हापूस उत्पादक क्षेत्रामध्ये तयार झालेला गारवा, वातावरणातील बदल तसेच ओखी वादळाचा फटका आंब्याला बसल्यामुळे आवक कमी प्रमाणात होत आहे. बाजारात दाखल होणारा आंबा हा सध्या कच्चा, कोवळा असून भाव सध्यातरी चढेच  आहेत. गुढी पाडव्यानंतर कोकणातील हापूस आंब्याची नियमित आवक अपेक्षित आहे. चालूवर्षी अनुकूल हवामानामुळे आंब्यांना मोहोरधारणा चांगली झालेली आहे. त्यामुळे ग्राहकांना दहा ते पंधरा  दिवसानंतर मुबलक आंबा उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात आले.