Mon, Apr 22, 2019 15:40होमपेज › Pune › दिव्यांगांच्या स्टॉल्सचे आकर्षण 

दिव्यांगांच्या स्टॉल्सचे आकर्षण 

Published On: Jan 08 2018 1:15AM | Last Updated: Jan 07 2018 11:30PM

बुकमार्क करा
पिंपरी : महिला सक्षमीकरणासाठी महिला बचत गटांना प्रोत्साहन देऊन त्यांना एक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी महापालिकेतर्फे पवनाथडी जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यात विविध वस्तूंबरोबरच कलाकुसरीच्या वस्तूंना विशेष मागणी आहे. खासकरून यंदा दिव्यांगांचा स्टॉल सर्वांचे लक्ष वेधत असून, त्यांनी बनवलेल्या वस्तूंना विशेष मागणी होत आहे. 

मागील वर्षी प्रथमच अपंग महिला बचत गटांनी सहभाग घेत पवनाथडीत शिरकाव केला होता. यंदा तीन वेगवेगळे स्टॉल लावण्यात आले असून, प्रियंका दबडे व नेहा व्यवहारे या दोन दिव्यांग महिलांनीही या वर्षी पवनाथडीत स्टॉल लावले आहेत. फिजिकली चॅलेंज्ड, व्यक्तींना मदत करणार्‍या निर्माल्य ट्रस्टच्या सहयोगाने या दोघींनी स्वतः बनवलेल्या लाकडाच्या वस्तू; तसेच सर्वच ऋतूंत बहुपयोगी व पर्यावरणपूरक अशा वस्तू विक्रीस ठेवल्या असून, कलाकुसरीच्या वस्तूंना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रहार अपंग संघटनेच्या सद्भावना अपंग बचत गटाने सलग दुसर्‍या वर्षी स्टॅाल लावला आहे. यंदाच्या पवनाथडीत सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय भारत सरकारद्वारा नियुक्त महात्मा गांधी सेवा संघ संचालित जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्रातर्फेही स्टॉल लावण्यात आला आहे. यात पूजा मुनोत व इतर सदस्यांनी बनवलेल्या लाकडाच्या आकर्षक वस्तू; तसेच गिफ्ट आर्टिकल्स विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत.