Sun, Mar 24, 2019 06:15होमपेज › Pune › सभागृह गरजले अन प्रशासनावर बरसले

सभागृह गरजले अन प्रशासनावर बरसले

Published On: Aug 24 2018 12:46AM | Last Updated: Aug 24 2018 12:45AMपुणे : प्रतिनिधी

महापालिकेच्या मुख्यसभेत एलईडी प्रकल्पातील गैरव्यवहार, ई- बसेस खरेदी, पाणी प्रश्‍न, वाहतुक, कर्मचार्‍यांच्या बदल्या आदी प्रश्‍नांबरोबरच नगरसेवकांची कामेच होत नसल्याची टिका करत भाजप नगरसेवकांनी मुख्यसभेत प्रशासनावर जोरदार आगपखड केली. विरोधी पक्षातील नगरसेवकांनांचीही त्यांना साथ मिळाली. मात्र, तब्बल शंभरहून अधिक नगरसेवकांचे संख्याबळ असलेली सत्ताधारी भाजपाही अक्षरश हतबल झाल्याचे यानिमित्ताने दिसून आले.

मुख्यसभेच्या कामकाच्या सुरवातीलाच काँग्रेस चे गटनेते अरविंद शिंदे यांनी ई- बसेस खरेदीवरून प्रशासनावर शाब्दिक हल्ला चढविला. आयुक्त परस्पर असे निर्णय कसे घेतात. हा महापौर आणि सभागृहाचा अवमान असा आरोपच त्यांनी केला. शिंदे यांच्यानंतर सत्ताधारी भाजप नगरसेवकांनी आपल्या तक्रारींचा पाढाच वाचला. सत्ताधारी भाजपच्या सदस्यांनी एलईडी, वाहतुक, खड्डे, पाणी पुरवठा अशा विविध विषयांपासून अधिकार्‍यांकडून मिळणारी वागणूक आणि मनमानीपणा यावरून प्रशासनाला अक्षरश धारेवर धरले. अधिकारी पत्रांना उत्तर देत नाहीत, कामे करत नाहीत , रस्त्यात बसेस बंदचे प्रमाण वाढत आहे, असे एकामागून एक प्रश्न जोरकसपणे मांडयाला सुरुवात केली. मुख्य सभेने दिलेले आदेश आणि आखलेली धोरणे पायदळी तुडवत अधिकार्‍यांकडून मनमानी काम करत आहेत. ते मस्तवाल झाले असून त्यांच्यावर कोणाचाही वचक राहिलेला नाही, अशी टीका करत आयुक्त साहेब तुम्ही हातात आसूड घ्या, आणि या अधिकार्‍यांना वठणीवर आणा. अण्यथा पालिकेत एखादा अनर्थ घडेल, असा इशारा नगरसेवकांनी यावेळी दिला. तर अनेकांनी अक्षरश हतबलता व्यक्त केली.  

त्यात  विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनीही प्रशासनावर टिकेची संधी सोडली नाही. मात्र ही टिका करताना हे सत्ताधार्‍यांचे अपयश आणि सत्ता काळात चुकीच्या पद्धतीने अधिकार्‍यांवर आणलेल्या दाबावामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगत भाजपवर निशाणा साधला. 

महापौरांनी शिरोळेंना खडसावले

एकिकडे सत्ताधारी नगरसेवक प्रशासनावर टिका करीत असताना नगरसेवक सिध्दार्थ शिरोळे यांनी भाषणाला सुरवात केल्यानंतर बसेस खरेदीच्या प्रकियेवरून आयुक्तांचे अभिनंदन केले. त्यावर काँग्रेसचे गटनेते शिंदे यांनी आक्षेप घेतला. हा महापौरांचा अवमान असल्याचे ते म्हणाले, त्यावर महापौरांनी शिरोळे यांना तुम्हाला याठिकाणी प्रशासनाचे कौतुक करायला नाही आलात तर नागरिकांचे प्रश्‍न मांडायला आले आहेत या शब्दात त्यांना खडसावले.

आधीच ठरली रणणीती’

मुख्यसभेत प्रशासनाला टार्ग़ेट करण्याची रणणिती विरोधी पक्षातील एका गटनेता आणि एक पदाधिकारी यांनी आधीच ठरविली होती.  त्यामागे वेगवेगळी कारणे असल्याची चर्चा पालिका वर्तुळात रंगली होती. त्यात एका अधिकार्‍याने केलेले ‘ध’ चा ‘मा’ कारणीभूत ठरला. गत आठवड्यात आयुक्त सौरभ राव अधिकार्‍यांची बैठक घेऊन मुख्यसभेत सर्व अधिकार्‍यांनी उपस्थित राहावे. व नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची आत्मविश्वासाने उत्तरे द्या. यासाठी घाबरायचे कारण नाही अशा सूचना दिल्या होत्या, मात्र, त्यामधील एका अधिकार्‍याने काही पदाधिकार्‍यांना भेटून यापुढे ’आयुक्त आणि अधिकारी तुमचे ऐकणार नाहीत’ अशी चुकीची माहिती पोहचविली. त्यामुळे चिडलेल्या पदाधिकार्‍यांनी आयुक्तांनी धारेवर धरल्याची रणनिती आखली होती. तर बसेस खरेदीसह एका महत्वाच्या विषयात आयुक्त विश्‍वासात घेत नसल्याचे लक्षात आल्यानंतर आयुक्तांवर हा रोष व्यक्त करण्यात आल्याची चर्चा होती.