Wed, Jul 17, 2019 18:52होमपेज › Pune › उत्तरेकडे जाण्यासाठी हडपसर टर्मिनसवरून सुटणार गाड्या

उत्तरेकडे जाण्यासाठी हडपसर टर्मिनसवरून सुटणार गाड्या

Published On: Dec 30 2017 4:19PM | Last Updated: Dec 30 2017 4:19PM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी 

हडपसर रेल्वे टर्मिनसचे काम नोव्हेंबर २०१८ पर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दै. पुढारीशी बोलताना दिली आहे. सुमारे २४ कोटी रुपये टर्मिनससाठी मंजूर करण्यात आले होते. मात्र, त्याला झालेल्या विलंबामुळे त्याचा खर्च आणखी वाढू शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. पुणे स्टेशनवरून दररोज सुमारे दोनशे गाड्या ये-जा करतात व दीड लाख प्रवासी प्रवास करतात. यामुळे पुणे स्टेशनवर स्वाभाविकपणे याचा भार पडतो. 

हडपसर स्टेशन पुण्यापासून केवळ ६ किलोमीटर अंतरावर असून हे टर्मिनस विकसित झाल्यानंतर पुणे स्टेशनवर येणारा अतिरिक्त ताण सुटू शकणार आहे. उत्तर भारतात जाणार्‍या गाड्या हडपसर येथून सोडण्याचा विचार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. हडपसर टर्मिनसचा प्रश्‍न जागेअभावी गेली कित्येक वर्षे रखडला होता.  जागा मिळतच नाही म्हटल्यावर रेल्वे प्रशासनाने उपलब्ध जागेत टर्मिनस उभारण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार काही प्रमाणात कामे सुरू झाल्याचे रेल्वेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. प्लॅटफॉर्मची लांबी वाढविणे, नवीन प्लॅटफॉर्म बांधणे, पादचारी पूल उभारणे, वाहन तळ, पार्सल ऑफिस, वेटिंग रुमची कामे देखील लवकरच सुरू करण्यात येतील. 

हडपसरला पोहोचणे सध्या दिव्यच

हडपसर टर्मिनसचे काम पूर्ण झाल्यानंतर उत्तर भारतात जाणार्‍या बहुतांश गाड्या तेथूनच सुटणार असल्या तरीदेखील पुणे शहरातून हडपसर स्टेशनला पोहोचणे सध्यातरी दिव्यच आहे. पीएमपीएलची बेभरवशाची सेवा, रिक्षाचालकांकडून प्रवाशांची होणारी लूट यामुळे हडपसर टर्मिनसला पोहोचणे प्रवाशांच्या गैरसोयीचे ठरणार आहे. हडपसर येथे जाण्यासाठी पुण्यातून सक्षम सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध झाल्यानंतरच तेथून उत्तरेत जाणार्‍या गाड्या सोडाव्यात, अशी मागणी प्रवासी संघटनांनी केली आहे.