Fri, Apr 26, 2019 09:38होमपेज › Pune › सरकारने ‘अच्छे दिन’चे गाजर दाखवायचे काम केले 

सरकारने ‘अच्छे दिन’चे गाजर दाखवायचे काम केले 

Published On: Feb 17 2018 2:07AM | Last Updated: Feb 17 2018 2:01AMपिंपरी : प्रतिनिधी 

सरकारने  लोकांना ‘अच्छे दिन’चे गाजर दाखवले; पण हे सरकार पूर्णतः अपयशी ठरले आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी येथे केली.

पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) राष्ट्रवादी युवती, युवक, विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने आज शुक्रवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पिंपरी येथे शहराध्यक्ष वाघेरे यांच्या नेतृत्वाखाली केंद्र व राज्यातील नाकर्त्या शासनाचा निषेध करण्यासाठी ‘गाजर डे’ साजरा करण्यात आला. त्या वेळी वाघेरे बोलत होते. या आंदोलनात कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, प्रवक्ते फजल शेख, महिला शहराध्यक्षा नगरसेविका वैशाली काळभोर, निकिता कदम, पंकज भालेकर, सुलक्षणा धर, हर्षवर्धन भोईर, लाला चिंचवडे, गंगा धेंडे, वर्षा शेंडगे, आनंदा यादव, कुणाल थोपटे, वर्षा जगताप, ज्योती शिंदे, स्नेहल जगदाळे आदी सहभागी झाले होते.

भाजपने लोकसभा निवडणुकीपूर्वी वर्षाला दोन कोटी युवकांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते; मात्र प्रत्यक्षात गेल्या चार वर्षांत केवळ सहा लाख रोजगार निर्मिती झाली आहे. आहे त्यांचे रोजगार या नाकर्त्या सरकारमुळे गेले आहेत. त्यामुळे बेरोजगारी वाढली आहे. 15 लाख प्रत्येकाच्या खात्यात जमा करण्याचे आश्वासन दिले होते, त्याचेही पुढे काही झाले नाही. त्यामुळे भाजपने केवळ देशातील जनतेला ‘गाजर’ दाखविण्याचे काम केले आहे. आता युवकांना हे सरकार ‘पकडो तळायला’ लावत आहे. हा प्रकार म्हणजे निर्लज्जपणाचा कळस आहे, असा हल्लाबोल वाघेरे यांनी केला; तसेच पारदर्शक, भयमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्तीचा नारा देऊन पालिकेत सत्तेत आलेले भय दाखवून भ्रष्टाचार करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. भाजपने दाखविलेल्या भरमसाट आश्वासनांपैकी सरकारचा कार्यकाळ संपत आला तरी एकही आश्वासन पूर्ण केले नसल्याची टीका वाघेरे यांनी केली.