Tue, Jul 23, 2019 18:49होमपेज › Pune › ढाबा तेथे कसा काय एसटीचा बसथांबा?

ढाबा तेथे कसा काय एसटीचा बसथांबा?

Published On: Jun 13 2018 1:34AM | Last Updated: Jun 13 2018 1:34AMनिमिष गोखले

पुणे : चालक अन् वाहकांना फुकट आणि प्रवाशांना भुर्दंड... आता तुम्ही म्हणाल की हा काय प्रकार आहे...पण, ही आहे राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसने प्रवास करणार्‍या प्रवाशांची व्यथा... कारण, सध्या रस्त्या-रस्त्यांवर ‘ढाबा तेथे बस थांब्या’ची सोय फुकट्या चालक अन् वाहकांमुळे झाली आहे. मात्र, याचा नाहक त्रास प्रवाशांना होत असून, प्रवासाचा वेळ तर जातोच आहे, पण निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ खाण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे. राज्यातील अनेक रस्त्यांवर हे चित्र पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे, नुकतीच गाजावाजा करून सुरु करण्यात आलेली शिवशाही देखील ऐटीतच अशा अनधिकृत थाब्यांवर थांबवली जाताना पाहायला मिळत आहे. 

एसटीने काही वर्षांपूर्वी विनाथांबा बस सेवा सुरू केली. पुणे-नगर, पुणे-सातारा, पुणे-बारामती या लहान अंतरावर विनावाहक, विनाथांबा बस धावू लागल्या. परंतु, स्थानकावर प्रवासी ज्यावेळी एसटीमध्ये चढतात, त्याचवेळी चालकाकडून ही विनाथांबा गाडी असली तरीदेखील गाडी एकदा थांबेल, असे सांगण्यात येते. पुणे-पणजी या 11 तासांच्या प्रवासासाठी खासगी गाड्या दोनदा थांबताना दिसतात. मात्र याच प्रवासासाठी एसटी तब्बल 5 वेळा विविध ढाब्यांवर थांबते. राज्य मार्ग परिवहन महामंडळाने ठरवून दिलेल्या हॉटेलमध्येच चालकाने गाडी थांबवावी, अशा स्पष्ट सूचना चालक-वाहकाला देण्यात आल्या असल्या, तरीदेखील त्याचे काटेकोर पालन होत नाही. 

एसटी स्थानक वगळून अन्यत्र गाडी थांबवण्याची ही सवलत सुरुवातीला फक्त लांब पल्ल्याच्या गाड्यांना व ती सुद्धा केवळ एशियाडसारख्या गाड्यांनाच होती. त्यातही महामंडळ ज्या हॉटेल किंवा ढाब्यावर गाडी थांबणार असेल, त्यांच्याकडून वार्षिक शुल्क स्वीकारत असे. त्यानंतरच त्या मार्गावरच्या गाड्यांना एसटी स्थानक वगळून संबंधित हॉटेलवर चहापाणी, नाश्ता यासाठी काही वेळ थांबण्याची सवलत मिळत असे. आता मात्र पुणे-औरंगाबाद, पुणे-नगर अशा फक्त अडीच ते चार तासांच्या प्रवासातही एसटीच्या सर्वच गाड्या विशिष्ट ढाब्यांवर थांबवण्यात येतात. 20 मिनिटांपासून ते थेट 40 मिनिटांपर्यंतही गाड्या थांबवण्यात येतात. त्यामुळे प्रवाशांचा वेळ तर वाया जातोच, शिवाय खिसाही विनाकारण हलका होतो. महामंडळाचे अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत, असा आरोप प्रवाशांकडून होत आहे. कामगार संघटनाही ‘चालक, वाहक विरोधात जायला नको’ म्हणून यावर काही बोलत नाहीत. काही चालक, वाहकांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, आमचे पगार पाहा, इतक्या कमी पगारात काम केल्यावर प्रवासात काही ठिकाणी आमच्या खाण्याची विनाशुल्क सोय होत असेल, तर त्यामुळे प्रवाशांच्या किंवा आणखी कोणाच्या पोटात दुखायचे काही कारण नाही.