होमपेज › Pune › गोल्डन सिताफळे आली

गोल्डन सिताफळे आली

Published On: Jul 25 2018 1:38AM | Last Updated: Jul 25 2018 12:56AMपुणे : प्रतिनिधी

रंगाने पांढरी-पिवळसर, चवीला गोड असलेल्या गोल्डन सिताफळांची मार्केटयार्डात आवक सुरू झाली आहे. मंगळवारी मार्केटयार्डातील फळबाजारात 20 ते 25 कॅरेट गोल्डन सिताफळे दाखल झाली. नेहमीच्या सिताफळांच्या तुलनेत गोल्डन सिताफळे ही आकाराने मोठी, गरदार तसेच जास्त दिवस टिकत असल्याने याला ग्राहकांकडून मोठी मागणी होत आहे. या सीताफळास घाऊक बाजारात प्रतिकिलोस 25 ते 110 रुपये भाव मिळत आहे.

पुरंदर येथील माळशिरस परिसरातून ही आवक होत असल्याचे सांगून व्यापारी अरविंद मोरे म्हणाले, साधारण 100 ते 450 ग्रॅम पर्यंत या फळाचे वजन असून त्यास प्रतिकिलोस 25 ते 110 रुपये दर मिळत आहे. इतर नियमित आवक होणार्‍या सिताफळांची आज दोन ते अडीच टन इतकी आवक झाली. त्यास प्रति किलोस 10 ते 80 रूपये भाव मिळाला. पुरंदर, वडकी, दिवे घाट, खेड शिवापुर पुणे जिल्हा परिसरातून ही सिताफळे बाजारात दाखल होत आहे. यंदा समाधानकारक पावसामुळे गोल्डन सिताफळे आकाराने मोठी व चांगल्या दर्जाची आहेत. येत्या आठ ते दहा दिवसांत गोल्डन सिताफळांची आवक सुरळित होईल. दोन्ही सिताफळांचा हंगाम नोव्हेंबरपर्यंत सुरू राहील. या फळाला फ्रुट स्टॉल, ज्युस विक्रेते आदींकडून मोठी मागणी होत आहे.

याबाबत बोलताना शेतकरी एकनाथ यादव म्हणाले, दरवर्षी गोल्डन सिताफळाचे उत्पादन घेण्यास प्राधान्य दिले जाते. इतर फळांच्या तुलनेत या फळाला जास्त गर तसेच चवीला गोड असल्याने याच्या उत्पादनातून अधिक उत्पन्न मिळते. यंदा सुमारे 600 ते 650 झाडांची लागवड करण्यात आली आहे. प्रत्येक झाडाला 150 ते 200 आसपास फळे लागतात. तसेच, कमी पाण्यावर जास्त उत्पादन देणारे पीक म्हणून गोल्डन सिताफळ हा सर्वोत्तम पर्याय आहे. सिताफळांचा एकरी खर्च लागवडी नंतर दरवर्षी पंधरा हजार ते वीस हजार रुपये इतका येतो, तर उत्पन्न चार ते साडेचार लाख रुपयांपर्यंत येऊ शकते असेही त्यांनी सांगितले. 

गोल्डन सिताफळ इतर सिताफळांपेक्षा मोठे देखणे व चवीला गोड असते. गोल्डन सीताफळात बिया कमी असतात. झाडावरून पिकलेले फळ पडले तर ते दबते, पण फुटत नाही. फळ झाडावर पंधरा दिवस व झाडावरून काढल्यावर आठ दिवस टिकते. दुसर्‍या जातीच्या सिताफळांत तीस ते पस्तीस टक्के गर असतो, तर गोल्डन सिताफळात पन्नास टक्के गर असतो.