Wed, May 22, 2019 10:30होमपेज › Pune › बांगड्यांमधून सोन्याची तस्करी

बांगड्यांमधून सोन्याची तस्करी

Published On: Feb 08 2018 1:52AM | Last Updated: Feb 08 2018 12:44AMपुणे: प्रतिनिधी 

प्लास्टिकच्या जयपुरी बांगड्यांतून तस्करी करून आणलेले 21 लाख 76 हजार 502 रुपयांचे 699 ग्रॅम सोने आणि 1 लाख रुपयांचे 2 किलो केशर दोन वेगवेगळ्या विमानाने पुणे आंतरराष्ट्रीय विमानाने आलेल्या दोन बहिणींकडून सीमा शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांनी जप्त केले आहे. शेख निखत झैनुद्दीन आणि रोमाना झुबेर शेख अशी पकडलेल्या दोघींची नावे आहेत.  

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उपायुक्त भारत नवले यांनी दिलेल्या माहितीनुसार,  जेट एअरवेज आणि स्पाईस जेट अशा वेगवेगळ्या दोन विमानांनी शेख निखत झैनुद्दीन आणि रोमाना झुबेर शेख बुधवारी पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर आल्या. अधिकार्‍यांकडून प्रवाशांच्या सामानाची तपासणी सुरु असताना महिला अधिकार्‍यांनी त्यांची वैयक्तिक तपासणी केली. त्यावेळी त्यांच्या हातातील बांगड्या जड वाटल्याने त्यांना संशय आला. त्यानंतर त्याची बाहेरील बाजू काढून पाहिल्यावर आत शुद्ध 24 कॅरेटच्या सोन्याच्या रिंग आढळून आल्या़  दोघींकडे प्रत्येकी असलेल्या 4 बांगड्यांमधून एकूण 699़ 84 ग्रॅम सोने जप्त करण्यात आले. त्याची बाजारातील किंमत 21 लाख 76 हजार 502 रुपये आहे़  तसेच 1 लाख रुपये किंमतीचे 2 किलो केशरही त्यांच्याकडे मिळाले़  ते जप्त करण्यात आले आहे़ 
दरम्यान एकीला पकडले तर दुसरीचा संशय येऊ नये, यासाठी त्या दोघी  वेगवेगळ्या विमानाने आल्या असाव्यात, असा सीमा शुल्क विभागाचा अंदाज आहे़  त्याचा जबाब नोंदविण्यात आला. त्यावेळी दोघींनीही या बांगड्या आपल्या नसून मुंबईतील एकाला देण्यासाठी आपल्याला दिल्याचा त्यांचा दावा आहे़  सोन्याची तस्करी करणार्‍यांनी त्यांचा कॅरियर म्हणून वापर केला असल्याचे सांगितले. पुढील तपास सीमा शुल्क विभागाचे अधिकारी करीत आहेत.