Wed, Nov 14, 2018 14:33होमपेज › Pune › मालकिणीला वाचवण्यासाठी शेळीने दिले बलिदान

मालकिणीला वाचवण्यासाठी शेळीने दिले बलिदान

Published On: Jul 20 2018 1:12AM | Last Updated: Jul 20 2018 1:12AMटाकळी हाजी : वार्ताहर

शिंदेवस्ती (ता. शिरूर) येथील सुमन पुरुषोत्तम चोरे या बुधवारी (दि. 18) शेळ्यांना चरण्यासाठी घोडेवस्ती येथे रानात घेऊन गेल्या होत्या. तेवढ्यात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर  हल्‍ला केला. त्यावेळी एक शेळी आपल्या मालकिणीला वाचवण्यासाठी पुढे सरसावली आणि बिबट्याने तिची शिकार करून धूम ठोकली. चोरे यांचे नशिब बलवत्तर म्हणून जीवावर बेतलेला प्रसंग एका शेळीवर निभावला. 

चोरे या खाली बसलेल्या असताना बिबट्याने दबा धरून हळू हळू सरकत पुढे येत सुमन यांच्यावर हल्ला केला. सुमन यांचा साडीचा पदर बिबट्याच्या तोंडात येताच त्या बाजूला सरकल्या. तेवढ्यात सुमन यांची लाडकी शेळी त्यांच्याजवळ आली; तर अन्य शेळ्या घाबरून पळाल्या. जवळ आलेल्या शेळीला तोंडात धरून बिबट्याने पलायन केले. त्यामुळे सुमन यांचा जीव वाचला.

या घटनेची माहिती मिळताच लोक गोळा झाले. या घटनेने सुमन यांची काहीकाळ बोलतीच बंद झाली होती. दोन ते तीन तास त्या बोलू शकल्या नाहीत, असे त्यांचा मुलगा अजित चोरे यांनी सांगितले. टाकळी हाजी परिसरात बिबट्याचा वावर वाढला असून अनेक पाळीव प्राणी बिबट्याने फस्त केले आहेत. बुधवारी झालेल्या बिबट्याच्या हल्ल्याची माहिती वनपरिमंडळ अधिकारी प्रवीण क्षिरसागर यांना दिली असता, तत्काळ या कुटुंबीयांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. संभाव्य धोका विचारात घेऊन बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने तत्काळ पिंजरा लावावा, अशी मागणी होत आहे.