Sun, May 26, 2019 00:37होमपेज › Pune › ‘केंद्राने ८० लाख टन साखर निर्यातीस परवानगी द्यावी’

‘केंद्राने ८० लाख टन साखर निर्यातीस परवानगी द्यावी’

Published On: Jun 22 2018 1:40PM | Last Updated: Jun 22 2018 1:40PMपुणे : प्रतिनिधी

केंद्र सरकारने साखर निर्यातीसाठी सप्टेंबर महिनाअखेर दिलेली मुदत वाढवून डिसेंबरअखेर करावी. साखर निर्यातीसाठी 20 लाख टनांचा कोटा जाहीर केला आहे. त्यामध्ये आणखी 60 लाख टनांनी वाढ करुन एकूण 80 लाख टन साखर निर्यातीस परवानगी द्यावी. त्यासाठी 18 महिन्यांचा कालावधी निश्‍चित करावा अशी मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आल्याची माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष आमदार दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

साखर निर्यातीसाठी प्रति टनास 55 रुपयांचे अनुदान 100 रुपये करावे आणि कारखान्यांच्या थकित कर्ज रकमांची पुनर्बांधणी करुन त्यास मुदतवाढ देण्याची महत्वपूर्ण मागणीही चर्चेत करण्यात आली आहे. साखर उद्योगाच्या पाठपुराव्यामुळे केंद्र सरकारने 6 जून रोजी साखर उद्योगासाठी 4047 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. त्यामध्ये साखरेचा क्विंटलचा भाव 2900 रुपये निर्धारित करणे, साखरेचा 30 लाख टनांचा राखीव साठा करणे, कारखानानिहाय दरमहा साखरेचा कोटा निश्‍चित करणे अशा सकारात्मक उपाययोजना केल्यामुळे साखरेचे भाव वाढण्यासाठी मदत झालेली आहे. शिवाय कारखान्यांना मध्यंतरी साखरेचे भाव घसरल्यामुळे निर्माण झालेल्या अपुर्‍या दुराव्याचे (शॉर्ट मार्जिन) संकट दूर होण्यास मदत झालेली आहे. त्या पार्श्‍वभुमीवर महासंघाच्या वतीने नव्याने काही महत्वपूर्ण मागण्या केंद्राकडे करण्यात आल्या आहेत. केंद्रीय अन्न सचिव रविकांत व मुख्य साखर संचालक साहू यांची दिल्ली येथे नुकतीच भेट घेऊन त्यांना साखर उद्योगांच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आल्याची माहिती व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी दिली.

चर्चेदरम्यान अन्न सचिव रविकांत यांनी सांगितले की, साखरेचा कारखाना स्तरावरील विक्रीचा किमान दर बांधून देण्याचा घेतलेला निर्णय ऐतिहासिक आहे. त्याचा वेळोवेळी आढावा घेण्यात येत असून दरात वाढ करण्याचा अधिकारी अन्न विभागाने राखून ठेवलेला आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत कारखान्यांनी 2900 रुपये प्रति क्‍विंटल या दराखाली साखरेची विक्री करता कामा नये. तसेच साखर निर्यातीच्या दिलेल्या लक्षाकांची पुर्तता कारखान्यांनी करणे आवश्यक असल्याचे नमुद केल्याचे नाईकनवरे यांनी सांगितले.